टिटवाळा : टिटवाळ्यात (Titwala) आमदार विश्वनाथ भोईर (MLA Vishwanath Bhoir) आणि महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे (KDMC Commissioner Bhausaheb Dangde) यांनी भर पावसात पाहणी दौरा केला. या दरम्यान टिटवाळयातील इंदिरानगर परिसरात (Indira Nagar Titwala) रस्ते नाहीत. लोकांच्या घरात पाणी शिरलेले, कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. हे पाहून आमदारही देखील आवाक् झाले. महिला नागरिक यांनी आमदार आयुक्तांच्या समोरच समस्याचा पाढा वाचला. आत्ता आयुक्तांनी कालबद्ध कार्यक्रम घेऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
समस्या सुटणार की, केवळ आश्वासन ठरणार हे लवकर स्पष्ट होणार आहे. कारण अनेक वर्षापासून नागरिक नरक यातना भोगत आहेत. चाळ माफिया आणि महापालिका अधिकारी यांचे साटेलोटे असल्याने या चाळी उभ्या राहतात. त्याठिकाणी सुविधा पुरविल्याच जात नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
[read_also content=”लिथियम ion बॅटरीला जीव देणारा ‘प्राण’ हरपला, मात्र सुरू आहेत जगभरातील फोन https://www.navarashtra.com/web-stories/nobel-prize-winner-lithium-ion-battery-creator-john-b-goodenough-dies-at-the-age-of-hundred-years-nrvb/”]
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत टिटवाळ्यामध्ये सुरु असलेल्या कामे आणि समस्याबाबत माहितीसाठी शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, आयुक्त भाऊसाहेब दांगडे, शिवसेना शहर प्रमुख रवि पाटील, उपशहर प्रमुख विजय देशेकर यांच्या उपस्थितीत पाहणी दौरा मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला. या दौऱ्या दरम्यान आमदार भोईर आणि आयुक्तांचा ताफा संपूर्ण टिटवाळ्यात फिरला. काही भागात रस्ते खराब आणि पावसात रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरु होते.
भयानक परिस्थिती टिटवाळा येथील इंदिरानगर परिसरात होती. रस्ता नावाला सुद्धा नव्हता. साचलेले पाणी घरात शिरते, साचलेले पाणी वाहून नेण्याकरीता गटारे नाहीत. त्यामुळे सांडपाणी घरात घुसले होते. आजूबाजूला कचऱ्याचा ढिग दिसून आला. आमदार भोईर आणि आयुक्त आपल्या आपल्या परिसरात आले असल्याची माहिती मिळताच महिलांनी त्यांना गराडा घातला. पावसाळ्यात पाणी साचते. रस्ते नाही यावर महिलांनी भर दिला. १२ वर्षापासून ही समस्या सुटलेली नाही.नागरिकांनी समस्यांच्या पाढाच वाचला. यावेळी आमदार देखील हे ऐकून आवाक झाले. आमदारांनी महिलाना आश्वासन दिले की, समस्या सुटणार आहेत.
[read_also content=”भारतातील या राज्यात प्राण्यांना मिळते साप्ताहिक सुट्टी https://www.navarashtra.com/web-stories/unique-state-of-india-where-animals-get-weekly-off-in-latehar-village-jharkhand-nrvb/”]
आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की, मांडा टिटवाळ्यातील प्रमुख समस्या होत्या. त्यामध्ये रस्ते, पाणी, गटारी, रिंग रोडची अवस्था आदी समस्या आयुक्तांनी दौरा करुन जाणून घेतल्या आहेत. आयुक्तांनी समस्या सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखला जाणार असल्याचे सांगितले आहे.
आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले की, समस्यांची पाहणी केली आहे. या पाहणी दौऱ्यानंतर समस्या सोडविण्याकरीता एक रोडमॅप तयार केला जाणार आहे. येत्या मंगळवारी सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कालबद्ध कार्यक्रम तयार केला जाईल. या समस्या मार्गी लावल्या जातील. त्याचबरोबर रिंग रोड प्रकल्पात बाधित असलेल्यांच्या पुनर्वसनासंदर्भात जुलै महिन्यात बैठक घेतली जाणार आहे.