उरुळी कांचन : शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी येणारी लोकसभेची निवडणूक विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात होण्याची दाट शक्यता सध्या तरी निर्माण झाली आहे. ही निवडणूक सरळ दोघांमध्ये होती का? आणखी एखादा तगडा उमेदवार उभा राहून चांगले मतदान घेत कोणाला तरी पराजीत करण्याचा प्रयत्न करणार आहे का? हे पण या मतदारसंघात पाहणे लक्षणीय ठरणार आहे.
आमदारांची भूमिका महत्त्वाची
सहकार मंत्री दिलीप वळसे,आमदार दिलीप मोहिते,अतुल बेनके महेश लांडगे,चेतन तुपे, अशोक पवार या आमदारांचे विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. सहापैकी पाच आमदार महायुतीच्या बाजूचे आहेत तर एक आमदार महाविकास आघाडीच्या बाजूचा आहे. तरीही प्रत्येक आमदार मतदानाच्या वेळी नेमकी कोणती भूमिका घेतो यावर या ठिकाणच्या खासदाराचे भवितव्य ठरणार आहे.
आढळरावांना होणार का घड्याळ चिन्हाची मदत
शिवाजीराव आढळराव पाटील हे सध्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते आहेत, मात्र ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घड्याळाचे चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढण्याच्या मानसिक तयारीत आहेत. आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना २६ मार्च रोजी हा पक्षप्रवेश ठरला असल्याची माहिती दिली आहे. तसे जर झाले तर मागच्या वेळी डॉ.अमोल कोल्हे यांचे चिन्ह होते घड्याळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचे चिन्ह होते धनुष्यबाण. मात्र अजित पवार गटाकडे घड्याळाचे चिन्ह राहिल्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांना यावेळी घड्याळ या चिन्हाची मदत होणार का हे पहाणे पण महत्त्वाचे ठरणार आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदार म्हणून मतदारसंघात न ठेवलेला संपर्क आणि आढळराव पाटलांनी खासदार नसताना ठेवलेला मजबूत संपर्क, यापैकी नेमकी कोणती गोष्ट कोणाला मारक आणि कोणाला तारक ठरणार हे येणारा निकाल दाखवणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि आता अजित पवारांचा राष्ट्रवादी अशी ही चौथी वेळ आहे आढळराव पाटलांची पक्षांतर करण्याची त्यामुळे त्यांची प्रतिमा दलबदलू अशी झाल्याची चर्चा वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे याचा फटका आढळरावांना बसणार का? हाही प्रश्न जनतेच्या मनात आहे.
शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह या लोकसभा निवडणुकीपर्यंत निवडणूक आयोगाने प्रदान केले आहे. या चिन्हाचा कमी कालावधीत प्रसार,प्रचार करणे ही मोठी कसोटी विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे व त्यांच्या समर्थकांसमोर आहेच, शिवाय सहापैकी एकच आमदार आपल्या बाजूने असल्यामुळे नेमके कोणते धोरण राबवत विजय खेचून आणणार ? असा सवाल जनतेच्या मनात आहे.
तूर्तास डॉ.अमोल कोल्हे यांची विजयाची तुतारी वाजणार का अशी चर्चा मतदारसंघात आहे. खरे तर डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव हे मूळचे एकाच पक्षाचे नेते,परंतु वेळ परतवे या मंडळींच्या तात्विक, वैचारिक, राजकीय भूमिका बदलत गेल्याने डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवसेनेची साथ सोडत शरद पवारांची साथ पकडली आणि आपल्या अभिनयाने मिळवलेली *सेलिब्रिटी* या बिरुदावलीच्या वलयाची किमया दाखवत सलग तीन वेळा खासदार राहीलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना आस्मान दाखवत, शिरूरची लढाई मोठ्या मताधिक्याने जिंकत एक वेगळा इतिहास निर्माण केला होता, त्यावेळी त्यांचे चिन्ह होते घड्याळ.
मात्र जर शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली तर ते यावेळी घड्याळ हे चिन्ह घेऊन लढतील आणि २०१९ साली त्यांना जो पराभवाचा फटका बसला. त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी घड्याळाची टिकटिक वाजवत साधणार का? हा या मतदारसंघातील जनतेला पडलेला प्रश्न आहे.
त्यामुळे तुतारी व घड्याळ या दोन्ही चिन्हांपैकी कोणते चिन्ह जनतेच्या मनावरील आपला ठसा मजबूत करत, तसेच हे उमेदवार आपल्या वैयक्तिक प्रतिभेच्या, प्रसिद्धीच्या आणि पक्षाच्या बळावर कोण कोणावर मात करतय हेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता यावेळी अनुभवणार आहे.
Web Title: The tick tick ticking of clock of shivajirao adharao patil will sound like trumpeting of foxes people of shirur became curious nryb