चिखली : तिरोडा (Tiroda) शहराच्या मध्यभागी असलेल्या प्राचीन खामकान्हा तलावाला (Khamkanha lake) काही व्यक्तींकडून बुजवण्यात येत असून तलावाचे सपाटीकरण करण्यात येत आहे. तर तलावाचे सपाटीकरण करून या तलावावर कब्जा करण्याचा डाव असून शहरातील नागरिकांच्या धार्मिक भावना या तलावाशी जुळल्या असल्याने या तलावाला शासनाने हस्तांतर करून तलाव पूर्ववत करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी (Collecter) यांना निवेदनातून केली आहे.
शहरातील अशोक वार्ड व सुभाष वार्ड परिसरात ६ ते ७ एकर जागेत खामकान्हा तलाव आहे. याच परिसरात प्राचीन विठ्ठल रखुमाई देवस्थान, हनुमान मंदिर आहे. तर पर्यावर्णीय व धार्मिकदृष्ट्या या तलावाला विशेष महत्व आहे. उल्लेखनीय म्हणजे, हिंदू धर्माच्या काही धार्मिक कार्यक्रमासाठी शहरातील नागरिक या तलाव परिसरात एकत्र येत असतात. तर शहरातील गणेश मुर्ती, दुर्गा, शारदा माताच्या मुर्तीसह कृष्णजन्माष्ठमी निमित्त कान्होबा विसर्जन, व हरतालिका गौरी विसर्जन याच तलावात करण्यात येते. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या या तलावाशी धार्मिक भावना जुळल्या आहे. त्यातच तलावामुळे शहरातील पाणी पातळीही चांगली आहे.
मात्र, काही व्यक्तींकडून आपल्या व्यक्तिगत लाभासाठी या तलावाला बुजवण्यात येत असून तलावाची पाळ फोडून त्याचे भरण तलावात टाकण्यात येत आहे. त्यामुळे या तलावाचे सपाटीकरण होणार आहे. ज्याचा विपरीत परिणाम होऊन जल व वायू प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा सदर तलाव शासनाने हस्तांतरण करून तलावाचे खोलीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तर ३०० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या १७ पानाचे निवेदन जिल्हाधिकारी (Collecter) यांना सादर करण्यात आले आहे. तर या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री (CM), उपमुख्यमंत्री (Vice-CM), पर्यावरण मंत्री (Environment Minister), मुख्य सचिव, प्रधान सचिव (पर्यावरण) आदींना पाठविण्यात आल्या आहेत.