'या' जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार, ११ माजी नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण (फोटो सौजन्य-X)
मुंबई : शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होत 17 जूनला महाराष्ट्रातील पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशीव जिल्ह्यातील उबाठा पक्षाच्या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या चार जिल्ह्यांत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर, विदीशा या जिल्ह्यांमधील उबाठा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला.
पुणे जिल्हा काँग्रेस प्रदेश सचिव सोनाली मारणे, नगरसेवक राहुल तुपेरे, काँग्रेस शहर सरचिटणीस किरण मारणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगल पवार, गिऱीष जैवळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती नगर परिषदेतील माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, माजी नगरसेवक सुधीर सातपुते, प्रमोद गेडाम, अनिता गेडाम, राजू सारंगधर, चंद्रकांत खारकर, शोभा पारखी, शीतल गेडाम, प्रतिभा सोनटक्के, आशा निबांळकर आणि प्रदीप वडाळकर या ११ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पुण्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. धाराशीवमधील सोमनाथ गुट्टे, आप्पासाहेब बिराजदार, शंकर चव्हाण, नागनाथ कदम, इलाई शेख, शहाजी हाके यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्याचे उबाठा उपजिल्हाप्रमुख शंकर दर्जी, नगरसेवक गणेश वडनेरे, मनोज बोरसे, राहुल टीभे, गोविंद मोरे यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.
वरोरा नगरपरिषदेचे दिनेश यादव, प्रणाली मेश्राम, सुषमा भोयर आणि किशोर टिकले या ४ माजी नगरसेवकांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. वरोरा भद्रावती विधानसभा मतदार संघातील सरपंच गोविंद कुळमेथे, सुचिता ठाकरे, उमेश दातारकर, माजी सरपंच विठ्ठल जोगी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वरोरा तालुका उबाठा शहरप्रमुख संदीप मेश्राम, उबाठा विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्यामसिंह ठाकूर, उपाध्यक्ष धरमसिंह ठाकूर, राष्ट्रीय संघटक ठाकूर नेमसिंह सिसोदिया, मेवाड एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष जीवन सिंघवी यांनी पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी श्यामसिंह ठाकूर यांची राजस्थान राज्य मुख्य समन्वयकपदी नियुक्ती करण्यात करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तसे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले. तसेच मध्यप्रदेशातील जबलपूरचे उबाठा उपराज्यप्रमुख शैलेंद्र बारी, विदिशा जिल्हा प्रमुख विजेंद्र लोधी, जबलपूर जिल्हा प्रमुख सुजित पटेल, नगर प्रमुख मुकेश सारठे, इंदोरमधील जावेद खान, अभिषेक कालरा, सुरेश गुर्जर, राजीव चतुर्वेदी यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आणि विकासाचं वारं घेऊन पुढे घेऊन चाललोय. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना राज्याला विकासाच्या दिशेनं नेण्याचे काम केले. त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या. या राज्यातील मतदारांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला. त्यामुळे ८० जागा लढवून ६० जागांवर विजय मिळवला. महायुतीने २३२ जागा जिंकून ऐतिहासिक बहुमत मिळवले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक शिवसेनेत येत आहेत कारण दिलेला शब्द पाळणे आणि जनतेच्या कामांना प्राधान्य देण्याचे काम शिवसेना करते, असे ते म्हणाले. काम करणाऱ्या लोकांना शिवसेनेवर विश्वास वाटतो, त्यामुळे दररोज विविध पक्षाचे लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत, जनतेचे आशीर्वाद आणि वाढलेल्या बळाच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आवाहन यावेळी केले.