पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील पूल (Chandni Chowk) काही महिन्यांपूर्वीच पाडण्यात आला. हा पूल पाडला गेल्याने चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पण आता ही वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने नव्या उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. पर्यायी बाह्यवळण रस्ते तयार करण्याचे काम वेगाने केले जात आहे. त्यात आता चांदणी चौकाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दीड महिन्याचा कालावधी लागेल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिली.
चांदणी चौकातील या पुलाचे काम एप्रिल महिन्यापूर्वी पूर्ण करून एक मे रोजी याचे उद्घाटन करण्याचे नियोजित होते. मात्र, ही डेडलाईन गेली तरी देखील अद्याप या पुलाचे काम पूर्ण झाले नसल्याचे दिसत आहे. त्याबाबत एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली होती.
त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘मुंबई-बंगळुरू महामार्गादरम्यान एनडीए चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘एनएचएआय’ने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्या ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्यात येणार असून, पुलासाठीचे खांब उभारण्यात आले आहे. मात्र, सिमेंट काँक्रिटचे गर्डर पूर्ण तयार नाहीत. हे गर्डर टाकण्यासाठी मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्याची शक्यता आहे. या पूलाचे काम पूर्ण होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागले, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार होते उद्घाटन
या पुलाचे काम पूर्ण होऊन 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन केले जाणार होते. मात्र, या पुलाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने आणखी दीड महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.