सूरजागड प्रकल्पामुळे टायगर कॉरिडोर धोक्यात; १ लाखांहून अधिक झाडांची कत्तल
Gadchiroli News: गडचिरोलीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बहुचर्चित सूरजागड लोह खाणीतील उत्खनन क्षमतेत वाढ करण्यासाठी पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 937 हेक्टर जंगल क्षेत्र खाणकामासाठी सुमारे 1.23 लाख झाडांची कत्तल होणार असून, 900 हेक्टर जंगल क्षेत्रातील झाडे तोडण्यास वन्यजीव संरक्षणाच्या अटींवर परवानगी देण्यात आली आहे.
परंतु, या निर्णयाला पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध होऊ लागला आहे. जंगल आणि जैवविविधतेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून, पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयांतर्गत सूरजागड प्रकल्पामुळे टायगर कॉरिडोर धोक्यात येणार आहे. तसेच १ लाखांहून अधिक झाडांची कत्तल करण्यावरही पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड लोहखनिज प्रकल्पास दिलेल्या मंजुरीमुळे एक लाखांहून अधिक झाडांची कत्तल होणार आहे. या भागातील वाघांच्या स्थलांतर मार्गांवर (टायगर कॉरिडोर)ही धोका निर्माण होईल, असे गंभीर मत पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. दोन महिन्यांपूर्वी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या खाण उत्खनन क्षमतेत वाढ करण्यासाठी जनसुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या कोळसा नसलेल्या खाण प्रकल्पांसाठी असलेल्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीने (EAC) या कंपनीला उत्खनन क्षमता 10 दशलक्ष टनांवरून 26 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्यासाठी पर्यावरणीय मंजुरी देण्याची शिफारस केली होती.
या शिफारशीनंतर काही आठवड्यांतच पर्यावरण मंत्रालयाने लॉयड्स मेटल्सच्या ‘अयस्क-वॉशिंग प्लांट’साठी 900 हेक्टर जंगल क्षेत्रातील 1.23 लाख झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. यामुळे पर्यावरण तज्ज्ञ आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पामुळे जैवविविधतेवर परिणाम होण्याची तसेच वन्यजीवांच्या अधिवासात मोठा बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Mumbai Local Accident News: मुंबई लोकल अपघातात वेगळाच संशय; जखमी प्रवाशाने नेमकं काय
या परिसरात महाराष्ट्रापासून छत्तीसगढपर्यंत पसरलेले विस्तीर्ण जंगल आहे. गेल्या तीन वर्षांपासून सूरजागड टेकडीवर लोहखनिज उत्खननाचे काम सुरु आहे. त्यातच राज्य सरकारने पुन्हा लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीला 348 हेक्टर परिसरातील खाणकाम करण्यासाठी कंत्राट दिले आहे. या टेकडीवर जवळपास आधीच पाच खाणपट्ट्यांच्या कंत्राटाची निविदा प्रक्रिया सुरु असताना आता पुन्हा सूरजागड लोहखनिज प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
सूरजागड लोह खाणीच्या उत्खनन क्षमतेत वाढ करण्यास केंद्र सरकारच्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीने (EAC) मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका प्रलंबित असतानाच ही मान्यता देण्यात आली आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडला 2007 मध्ये खाण भाडेपट्टा मिळाला असला, तरी प्रत्यक्ष खाणकाम 2016 मध्ये सुरू झाले. मात्र, नक्षलवाद्यांच्या तीव्र विरोधामुळे काही काळातच ते थांबवावे लागले.
या प्रकल्पाला स्थानिक आदिवासी समाजाकडूनही सातत्याने विरोध होत आहे. वनहक्क कायद्यानुसार आदिवासींच्या जमिनीवरील हक्क आणि त्यांच्या पारंपरिक वनाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत लोहखनिज उत्खननाविरुद्ध आंदोलने सुरू आहेत. पर्यावरणीय आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही या प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या खाण विस्तारामुळे सुमारे ३० ते ४० गावांमधील ५० हजारांहून अधिक लोकांचे विस्थापन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.