Mumbai Local Accident News: मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी (9 जून) मध्य रेल्वेच्या झालेल्या अपघातात १३ प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून खाली पडले. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना अप आणि डाऊन फास्ट मार्गावर एकाचवेळी परस्परविरुद्ध दिशेने जाणाऱ्या दोन लोकल ट्रेनदरम्यान घडली. दोन्ही ट्रेन शेजारच्या ट्रॅकवरून जात असताना दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅगां एकमेकींना धक्का लागल्यामुळे प्रवासी खाली पडल्याचे प्राथमिक अंदाज मध्य रेल्वेने व्यक्त केला होता.
मात्र आता या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट समोर आला आहे. मध्य रेल्वेच्य प्राथमिक तपासातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अपघाताचा संभाव्य कारण ठरलेली गोष्ट म्हणजे ट्रेनजवळ असलेली लोखंडी रॉड. रेल्वे प्रशासनाने केलेल्या प्राथमिक तपासानुसार, ज्या लोकल ट्रेनमधून प्रवासी खाली पडले, त्या ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ओरखडे आढळून आल्याचे दिसत आहे. याशिवाय, अपघातात बचावलेला एक प्रवाशानेही अशाच पद्धतीची माहिती दिली. तो म्हणाला, “खाली पडण्याआधी आम्हाला काहीतरी मोठी वस्तू धडकल्यासारखं वाटलं. जणू ट्रेन भिंतीला आदळल्यासारखी जाणवली.” प्रवाशाने सांगितलेल्या या माहितीनंतर ती अज्ञात वस्तू एखादा लोखंडी रॉड असावा, असा संशय मध्य रेल्वेने व्यक्त केला आहे.
याशिवाय दुसऱ्या एका संभाव्य कारणानुसार, ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी दोन्ही लोकल ट्रेनमध्ये सामान्यपेक्षा प्रवाशांची गर्दी अधिक होती. अनेक प्रवासी ट्रेनच्या दरवाज्यांजवळ, फुटबोर्डवर उभे होते. ट्रेन एकमेकांच्या जवळून जात असताना, प्रवाशांच्या बॅगांचा किंवा शरीराचा धक्का लागून ते खाली पडले असावेत, असेही सांगितले जात आहे.
अपघाताची संभाव्य कारणे जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वेच्या तपास पथकाने घटनास्थळी भेट देत तपशीलवार पाहणी केली. यामध्ये दोन्ही रेल्वे ट्रॅकमधील अंतर मोजण्यात आले. त्यावरून या अपघातामागचे नेमके कारण काय, याची प्राथमिक चौकशी सध्या सुरू आहे. या तपासातून पुढे काय निष्पन्न होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
30 ते 40 हजार पगार असणाऱ्या व्यक्तीच्या बजेटमध्ये Maruti Dzire फिट होईल का?
मुंब्रा रेल्वे स्थानकात झालेल्या कालच्या अपघातानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याची माहिती आहे. रेल्वे संरक्षण दल (RPF), Government Railway Police Force (GRPF) आणि स्थानिक पोलिसांची तैनातीही वाढवण्यात आली आहे.काल रेल्वे अभियंत्यांनी दोन्ही ट्रॅकमधील अंतर मोजून पाहणी केली. सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ वरून धावणाऱ्या अप आणि डाऊन दिशेतील लोकल तसेच मेल-एक्सप्रेस गाड्या वळणावरून अत्यंत सावध आणि धिम्या गतीने मार्गक्रमण करत आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन अधिक सतर्क झाले असून, अपघाताची कारणमीमांसा करण्यासाठी तपास सुरू आहे.