फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा शहरातील एकमेव पवित्र हुतात्मा स्मारक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. 1984 साली स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ बांधले गेलेले हे स्मारक अनेक वर्षांपासून 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे रोजी झेंडावंदनासह साजरे होते. काही वर्षांपूर्वी स्मारकाचे सुशोभीकरण व दुरुस्तीही करण्यात आली होती. मात्र आता या स्मारकाच्या समोरच पालघर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने व्यापारी गाळ्यांचे बांधकाम सुरू केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
माजी आमदार सुनील भुसारा यांनी या बांधकामाचा तीव्र निषेध करत जिल्हा परिषदेवर टीका केली आहे. “हुतात्मा स्मारक हे श्रद्धेचे स्थान आहे, त्याच्या समोर गाळे बांधून त्याचे पावित्र्य नष्ट केले जात आहे. गाळ्यांमुळे परिसरात घाण वाढेल, स्मारक झाकले जाईल आणि बलिदानाची विटंबना होईल,” असा आरोप त्यांनी केला आहे. ते म्हणाले, “हे बांधकाम त्वरित थांबवून जमीनदोस्त करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
भुसारा यांनी स्पष्ट केले की, मूळत: स्मारकाच्या विकासासाठी आलेल्या निधीतूनच हे गाळे बांधले जात आहेत, जे पूर्णतः अनुचित आहे. “विकासाच्या नावाखाली स्मारकाचा श्वासच कोंडण्याचा प्रयत्न होत आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता आणि उप अभियंता यांच्याकडे तक्रारही दाखल केली आहे.
दरम्यान, जिप बांधकाम उपविभागाचे उप अभियंता अजय गायकवाड यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, “विकासात्मक सुधारणा या विषयाखालीच निधी आला आहे. त्यातून हे गाळे बांधले जात आहेत.”
मात्र या गाळ्यांमुळे स्मारकाचे महत्त्व व पवित्रता धोक्यात येणार असल्याने स्थानिक नागरिक, समाजसेवक आणि माजी आमदार संतप्त झाले आहेत. हुतात्म्यांच्या स्मृतीसाठी उभ्या राहिलेल्या या वास्तूची विटंबना न होता, स्मारकाभोवती बाग, हिरवळ, लहान मुलांची खेळणी आदींचे काम करणे अपेक्षित होते, असेही मत व्यक्त केले जात आहे. आता जिल्हा परिषद यावर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.