फोटो सौजन्य- प्रतिनिधी
कुर्ला येथे मद्यधुंद चालकाने बस चालविल्याने झालेल्या अपघातात अनेकांना प्राण गमावावे लागले. ही घटना ताजी असताना उल्हासनगरातून विरारला एक खाजगी बस विद्यार्थ्यांना घेऊन चालली होती. या खाजगी बसचा चालक बस वेडीवाकडी चालवित असल्याचे पोलिसाच्या लक्षात आल्याने पोलिसाने त्याला रोखले. बसचा चालक मद्यधुंद असल्याने त्यांच्या ताब्यातील बस पोलिसांनी जप्त केली. मद्यधुंद बस चालकाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे २६ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहे. वाहतूक पोलिसांनी बजावलेल्या कर्तव्य दक्षतेचे शहरात कौतूक केले जात आहे.
आज सायंकाळी एका खाजगी बस उल्हासनगर येथील जग्गू फुटबॉल अकॅडमीतील २६ लहान मुलांना घेऊन विरारला जाण्यासाठी निघाली होती. बसमधील लहान मुले विरारच्या ग्लोबल स्कूल येथे फुटबॉल खेळण्यासाठी जाणार होती. उल्हासनगरातून निघालेली ही बस वालधूनी पूल उतरून कल्याणच्या सुभाष चौकात आली. बस चालक बस वेडीवाकडी चालवित होता. ही बाब सुभाष चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करणारे वाहतूक पोलिस सुरेश पाटील यांच्या निदर्शनास आली. तात्काळ पोलिस पाटील यांनी बसच्या चालकाला हात दाखवून ती जागीच थांबविण्यास सांगितले. बस चालकाने बस थांबविली. तेव्हा पोलिस पाटील हे बस चालकाजवळ केले. बस चालकाने मद्यसेवन केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बस चालक सुरेंद्र प्रसाद गाैतम यांची ब्रेथ अ’नालायझर टेस्ट केली. त्यातही तो मद्य प्राशन केल्याचे उघड झाले. ही बाब अतिशय गंभीर असल्याने पोलिस पाटील यांनी बस चालकाच्या ताब्यातील बस जप्त केली. बस चालकास दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी बस चालकाला उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याने दंड भरला तर त्याच्या ताब्यातील बस सोडण्यात येणार आहे अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेश शीरसाट यांनी दिली आहे. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
पीएमपीएलमध्ये गर्दीत छेड काढणाऱ्या दारुड्याला महिलेने दिला चोप, व्हिडिओ व्हायरल
पीएमपीएल बसने प्रवास करणाऱ्या महिलेचा रुद्रावतार पाहिला मिळाला अन् सर्वांच्या भुवया देखील उंचावल्या, पण तिच्या या रूद्रावताराचा सर्वांनी कौतुक देखील केले. बसमधील गर्दीत छेड काढणार्या दारूड्याला या रणरागिनेने धडा शिकवला. त्याला चोप देत पोलिसांकडे दिले. तत्पुर्वी या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. भरदुपारी स्वारगेट ते वाकडेवाडी या बसमध्ये बाजीराव रस्त्यावर ही घटना घडली.
पीएमपीएलच्या बसमध्ये दारूड्या व्यक्तीने महिलेची छेड काढली. नंतर मात्र, या रणरागिणिचा रूद्रावतार सर्वांना पाहिला मिळाला. तिने या मद्यपीला चांगलाच चोप दिला. त्याचा व्हिडीओ देखील काहींनी काढला. सध्या तो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यावर लोकांनीही तिची पाठराखण करत कौतुक केले आहे.