मुंबई : एका वर्गातील तास संपवल्यानंतर दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी निघालेल्या शिक्षिकेचा लिफ्टमध्ये (Lift) अडकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालाड (Malad) पश्चिमेत चिंचोली पाठक (Chincholi Bunder) जवळ असलेला सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये (St Mary’s English High School) काल शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
जेनेली फर्नांडिस (वय, २६) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. फर्नांडिस या जून-२०२२ पासून सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये सहशिक्षिका या पदावर कार्यरत होत्या. जेनेली फर्नांडिस या काल दुपारी एका वर्गातील तास संपवल्यानंतर दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी निघाल्या. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे दरवाजा बंद होण्याआधीच लिफ्ट वरच्या दिशेने जाऊ लागली. लिफ्टमध्ये अडकल्याने जेनेली या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ नजीकच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात त्यांना मृत घोषित केले. मालाड पोलिसांनी (Malad Police) याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अदाणे यांनी, मृत जेनेली फर्नांडिस यांनी लिफ्टमध्ये पाय ठेवला असता लिफ्टनं त्यांना सातव्या मजल्याकडे ओढले. लिफ्ट आणि भिंतीमध्ये अडकल्यानं जेनेली फर्नांडिस यांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान, त्यांनी मदतीसाठी केलेला आरडाओरडा ऐकून शाळेतील कर्मचारी आणि मुले घटनास्थळी धावून गेले. त्यानंतर जेनेली फर्नांडिस यांना जवळच्या नजीकच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, सांगितले.