
‘पुढची बदली...' FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं...
या प्रश्नाला उत्तर देताना तुकाराम मुंढे यांनी बदलीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पुढची बदली कुठे होईल हे आपल्या हातात नसल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडून जो विभाग दिला जाईल, त्या विभागात आपण काम करू, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंढे यांनी भविष्यापेक्षा वर्तमानातील जबाबदारीला अधिक महत्त्व देत असल्याचेही सांगितले. सध्या ज्या पदावर काम करत आहे, त्या ठिकाणी चांगले काम करून जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.
FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या
भविष्यात कोणते पद मिळेल किंवा कुठे बदली होईल याचा फार विचार करत नसल्याचे मुंढे यांनी सांगितले. प्रत्येकाने भविष्याची चिंता करण्यापेक्षा वर्तमानात आपल्याकडे असलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्यावर भर द्यायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्याचबरोबर प्रशासनातील कामचुकारपणाबाबतही त्यांनी कठोर भूमिका मांडली. कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी कामात हलगर्जीपणा करत असेल तर त्याच्याशी तडजोड करण्याचे किंवा अनावश्यक सहानुभूती दाखवण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुलाखतीदरम्यान दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीचा मुद्दाही उपस्थित झाला. दूध भेसळ रोखण्यासाठी FDA कडून विविध पातळ्यांवर तपासणी आणि कारवाई केली जात असल्याचे मुंढे यांनी सांगितले. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्यामुळे FDA च्या कारवायांकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत अनेकदा बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे FDA मधील कारवायांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संभाव्य बदलीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. मात्र, बदलीसंदर्भातील निर्णय सरकारच्या अखत्यारित असल्याचे सांगत मुंढे यांनी आपण सध्याच्या जबाबदारीवर लक्ष केंद्रित करत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या बदलीबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले ‘सरकार जो विभाग देईल, त्या विभागात काम करेन’ हे वक्तव्य लक्षवेधी ठरले आहे.