संग्रहित फोटो
पुणे : राज्यात आगाीच्या घटना वारंवार घडत आहेत. आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोंढवा येथील एनआयबीएम रस्त्यावरील आलिशान इमारतीतील फ्लॅटमध्ये भीषण आग लागल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. या आगीत ज्येष्ठ दाम्पत्य गंभीररित्या जखमी झाले असून, त्यात ६५ वर्षीय ज्येष्ठ महिला गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. तर, त्यांच्या बहिणीचे पतीही गंभीर जखमी झाले आहेत.
एनआयबीएम रस्त्यावर साळुखे विहार येथे सुर्वणयुग सनश्री ही आठ मजली इमारत आहे. चौथ्या मजल्यावर मनोज बोरकर (वय ७५) यांचा फ्लॅट आहे. त्यांच्याकडे त्यांच्या पत्नी यांची बहिण वृंदा संगवार (वय ६८) या व वृंदा यांच्या भावाचा मुलगा विशेष कलेढोणकर हे आले होते. तिघेच घरी होते. दरम्यान, त्यांनी बेडरूममध्ये दिवा पेटवून लावला होता. तो पेटता दिवा खिटकीच्या पडद्याला लागला. पडदा पेटल्यानंतर पुर्ण बेडरूममध्ये आग पसरली. आग पसरल्यानंतर मुलगा विशेष बाहेर पळाला. पण, वृंदा व मनोज हे आत आडकले.
आगीने काही क्षणताच पुर्ण घराला विळखा घातला. आग इतकी पसरली की धुराचे लोळ पसरले. घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दल व पोलिसांना देण्यात आली. लागलीच कोंढवा पोलीस व चार अग्निशमन दलाच्या गाड्या व जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीने मोठे रूप धारण केले होते. जवानांनी पाण्याचा मारा करत दुसरीकडे घरात अडकलेल्या मनोज व वृंदा यांना बाहेर काढण्यास सुरूवात केली. मोठ्या प्रयत्नानंतर या दोघांनाही बाहेर काढण्यात आले. परंतु, वृंदा या गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. तर मनोज यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. वृंदा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा : जादा परताव्याच्या आमिषाने 2 जणांची फसवणूक; तब्बल एक कोटी ३२ लाखांना घातला गंडा
पुण्यात शाळेच्या बसला भीषण आग
पुण्यात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहरातील खराडी परिसरात गुरुवारी शाळेच्या बसला आग लागली आणि या घटनेत किमान 15 विद्यार्थी होते, विद्यार्थी सुरक्षित बचावले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, तुळजा भवानी नगर परिसरात दुपारी ही घटना घडली. त्यांनी सांगितले की, यावेळी विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर त्यांच्या घरी जात होते. चालक शाळेच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना दुपारी 2.45 च्या सुमारास वाहनातून धूर निघताना दिसला. त्यांनी तात्काळ बस थांबवली आणि उपस्थित लोकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना बसमधून उतरवले. विद्यार्थी बसमधून उतरल्यानंतर चालकाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने संपूर्ण बस जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.