संग्रहित फोटो
सांगली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून दोघांना तब्बल एक कोटी ३२ लाख ८७ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी अनिल बाबुराव पाटील (रा. सांगली) यांनी तिघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अशुतोष प्रकाश कासेकर (रा. राधा रेसिडेन्सी, रामदेव पार्क, मुंबई पूर्व), पूनम भीमराव भोसले ऊर्फ जाधव (रा. १०० फुटी रस्ता, सांगली) आणि कुणाल सुरेश मिस्त्री (रा. मंगळवार पेठ, शिरोली पुलाजवळ, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादी अनिल पाटील व त्यांच्या नातेवाईक शोभा शिवगोंडा जैनावर यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले. सुरुवातीला दोघांनी काही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली. त्यावेळी संशयितांनी त्यांना थोडा परतावा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर संशयितांनी दोघांची बैठक घेतली. यावेळी शेअर मार्केटमध्ये मोठी रक्कम गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार अनिल पाटील व शोभा जैनावर यांनी संशयितांच्या शेअर मार्केट कंपनीमध्ये एक कोटी ४७ लाख ८७ हजारांची गुंतवणूक केली. गुंतवलेल्या रकमेतील १५ लाख रुपये दोघांना परत दिले. त्याचा परतावा म्हणून १९ लाख १५ हजार रुपयांची रक्कम देखील परत दिली. परंतु उर्वरित एक कोटी ३२ लाख ८७ हजार रुपयांची रक्कम देण्यास मात्र टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे अनिल पाटील यांनी फिर्याद दिली.
फसवणुकीतील टाेळी सक्रिय
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याच्या आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या घटना वाढत आहेत. सांगलीत गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांची टोळी काही वर्षांपूर्वी सक्रिय होती. यापूर्वी काही जणांना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा तब्बल एक कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सांगलीत शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणारऱ्या टोळ्या अद्याप सक्रिय असल्याचे स्पष्ट हाेत आहे.
उच्चशिक्षित तरुणाची फसवणूक
गेल्या काही दिवसाखाली क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दर महिन्याला दहा टक्के परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने पिंपरी- चिंचवड मधील उच्चशिक्षित तरुणाची ८० लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अविनाश सिंग आणि रवी ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मार्केटिंग आणि साखळी पद्धतीने उच्चशिक्षित तरुणांना त्यांच्या जाळ्यात ओढत होते. याबाबत सेमिनार घेऊन त्यांना कशा पद्धतीने परतावा मिळू शकतो. याबद्दल ते पटवून द्यायचे. पिंपरी- चिंचवड शहरातील उच्चशिक्षित असलेल्या तरुणाला क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ८० लाख रुपयांना गंडा घातला आहे.