सातारा : कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गळीत हंगाम आटोपता घेऊ नये. साखर आयुक्तांनी तशा स्पष्ट सूचना कारखान्याच्या अध्यक्षांना द्याव्यात, अशी मागणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांनी केली.
उदयनराजे यांनी पुणे येथील साखर संकुलामध्ये साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची जिल्हयातील उस प्रश्नाच्या संदर्भात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
या बैठकीच्या संदर्भाने प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की, सातारा जिल्ह्यात तसेच पश्चिम महाराष्ट्रात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. तथापि यंदाचा साखर कारखान्यांचा हंगाम संपत आला तरीही अद्याप बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतामध्ये उस उभाच आहे. उभ्या उसाची पूर्ण क्षमतेने तोड झाल्याशिवाय साखर कारखान्यांचे चालू असलेले गाळप थांबवले जावू नये, कार्यक्षेत्रातील आणि अतिरिक्त कार्यक्षेत्रातील उसाचा शेवटचा फड तोडल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही. यासाठी आवश्यक ते सुक्ष्म नियोजन करण्यात यावे, जेणेकरुन उस उत्पादकांची आर्थिक कोंडी होणार नाही, अशी मागणी उदयनराजे यांनी केली.
ऊस व कारखाना संबंधित अनेक विषयांवर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी उदयनराजे यांनी सविस्तर चर्चा केली. कारखान्यांना यासंदर्भात त्वरित तातडीच्या सूचना देण्यात येतील असे आश्वासन गायकवाड यांनी दिले.