मराठा आंदोलनावर उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया; मुख्यमंत्र्यांना केली 'ही' विनंती
मुंबई : ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणासाठी मराठा समाजाचा लढा सुरू झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणचा आज पाचवा दिवस आहे. त्यांनी दोन दिवसांपासून पाणी ही त्यागले आहे. तर आज त्यांनी वैद्यकीय पथकालाही परतावून लावले. तर काही जण हायकोर्टाच्या माध्यमातून आंदोलनाला कायद्याच्या कचाट्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आंदोलनातील काही हुल्लडबाजांमुळे मराठा समाजाला बदनाम करण्याचाही प्रयत्न होत असल्याचे आंदोलक सांगत आहेत. मराठा आरक्षणावरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. यावरुन आता भाजप नेते आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
उदयनराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
माझ्या पोटात असतं तेच माझ्या ओठात असतं. जे योग्य आहे तेच मी योग्य म्हणत असतो, माझी प्रकृती बरी नाहीये म्हणून मी आरक्षणाच्या ठिकाणी जाऊ शकत नाही. या आधी मी अंतरवालीला गेलो होतो. शासनाने लवकरात लवकर या आंदोलनावर तोडगा काढावा. जे आंदोलन करतायेत त्यांच्या प्रमुखांसोबत बोलून लवकरात लवकर मार्ग काढावा. मला कालच डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे मी तिथे येऊ शकत नाही. माझं मुख्यमंत्री यांच्यासोबत अजून बोलणं झालं नाही. मात्र माध्यमांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना विनंती आहे, आंदोलनकर्त्यांसोबत बसून काय तोडगा काढता येईल हे पाहावं. मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असं आवाहन उदयनराजे यांनी केलं आहे. तसेच आंदोलकांना मूलभूत सुविधा शासनाने पुवाव्यात अशीही मागणी त्यांनी केली.
मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. उपोषणाला बसलेले लोक आहेत त्यांच्यावर देखील त्यांचा परिवार अवलंबून आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांची जी काही कमिटी असेल त्यांच्याशी बोलून लवकरात लवकर तोडगा काढावा आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत, त्या त्यांना पुरवाव्यात असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
आरक्षणाचा मसुदा जरांगे पाटलांना पाठवला
मराठा आरक्षणाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आरक्षणचा अंतिम मसुदा पाठवला असल्याचे समजते आहे. आता यावर जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण घेतल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान आता मंत्रीमंडळ उपसमितीने मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा पाठवला असल्याचे समजते आहे. त्यावर आता जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पहावे लागेल. थोड्याच वेळात मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि समितीमधील अन्य सदस्य यांनी आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.