Uddhav Thackeray, Rahul Gandhi and Arvind Kejriwal will visit Markadwadi
माळशिरस : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. मात्र निवडणुकीच्या निकालावरुन जोरदार राजकारण रंगले आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीला एकतर्फी यश मिळाले. सत्तास्थापनेचा दावा आणि मंत्रिमंडळ विस्तारावरुन महायुतीमध्ये अंतर्गत राजकारण रंगले. त्याचबरोबर माळशिरसमधील मारकडवाडीमध्ये निवडणूक प्रक्रियेवर संपूर्ण गावाने संशय घेतला. तसेच बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता. आता या मारकडवाडीला इंडिया आघाडीचे नेते भेट देणार आहेत.
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज व्यक्त केला होता. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होणार होती. त्यामुळे जनता महायुतीच्या बाजूने निकाल देणार की महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. मात्र या निवडणुकीमध्ये महायुतीला संपूर्ण बहुमत मिळाले. न भुतो न भविष्यती अशा महायुतीच्या यशापुढे महाविकास आघाडी पूर्णपणे ढासळली. अगदी राज्यामध्ये विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यासाठी देखील विरोधी पक्ष राहिला नाही असा विजय महायुतीला मिळला. मात्र यामुळे महाविकास आघाडीकडून निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीन यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. मारकडवाडी गावामध्ये देखील गावकऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया आणि निकाल यामध्ये मोठी तफावत असल्याचे म्हटत पुन्हा निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी अडवले असले तरी आता इंडिया आघाडीमधील आप नेते अरविंद केजरीवाल, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे भेट देणार आहेत.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार उत्तम जानकर यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्या मारकडवाडीच्या भेटीबाबात माहिती दिली आहे. वाहिनीशी संवाद साधताना आमदार उत्तम जानकर म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरे पाच जानेवारीला मारकडवाडीला येणार आहेत. तर 10 तारखेला राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचे मारकडवाडीला येणाचे नियोजन सुरू आहे. हे लोक इथे गावाने बंड का केले हे जाणून घेण्यासाठी आणि इथे काय झाले हे पाहण्यासाठी येणार आहेत.” अशी माहिती उत्तम जानकर यांनी दिली आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचबरोबर राजकीय वर्तुळामध्ये मारकडवाडी गावाची जोरदार चर्चा झाली. ईव्हीएम मतदान प्रणालीवर संपूर्ण गावाने शंका उपस्थित केली. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदानासाठी पाऊल उचलले होते. त्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करुन ही प्रक्रिया थांबवली होती. या पार्श्वभूमीवर मारकडवाडीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला होता. तसेच ईव्हीएम प्रणाली विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. तर सत्ताधारी भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीनाथ पडळकर यांनी ईव्हीएम प्रणालीच्या बाजूने सभा घेतली होती.