
मुंबई : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल, असा सवाल वारंवार सत्ताधारी भाजपकडून विचारला जात असताना उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. “मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचेही नाव जाहीर करा उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असेल. असे विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे. मुंबईतील षणमुखानंद सभागृहात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आता जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आज (16 ऑगस्ट) सकाळी साडेदहा वाजेपासून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडत आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सत्ताधारी महायुतीकडून महाविकास आघाडीवर सातत्याने हल्ले होत असतात. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्यमंपदाचा चेहरा कोण असेल यावरून आरोप प्रत्यारोप होेत असतात. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत थेट भाष्य करून सत्ताधारी महायुतीला सडेतोड उत्तर दिले आहे. याचवेळी त्यांनी निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे. त्यांनी आज महाराष्ट्राच्याही निव़णुका घोषित कराव्यात. आमची तयारी आहे, असे म्हणत थेट सत्ताधाऱ्यांना आव्हानही दिले आहे.
हेदेखील वाचा: महाराष्ट्रातील हा रेल्वे ट्रॅक अजूनही इंग्रजांकडेच, ब्रिटिश कंपनीला द्यावे लागतात कोट्यवधी रुपये
उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभच्या निवडणुकीत आपण राजकीय शत्रुला तर पाणी पाजलेच आहे. ही लढाई लोकशाहीच्या रक्षणासाठी होती. आताची लढाई ही महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्र धर्माची लढाई आहे. जे महाराष्ट्र लुटायला आले आहेत. ही लढाई अशी लढायची की एकतर तू तरी राहशील किंवा मी तरी राहील.
उपस्थितांना संबोधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही तुुम्हाला यासाठी बोलवल आहे, ते पुढे जे काही करायचे आहे ते तुम्हाला करायचं आहे. आम्ही तर आहोतच. पण त्याआधी आपण एक शपथ घेतली पाहिजे की, स्वत:पेक्षा महाराष्ट्राचे हित जपू, मला उमेदवारी मिळाली, नाही मिळाली तरी चालेल पण यांना खाली खेचू. आपल्यात काड्या घालणारे लोक आहेत. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री कोण होणार, असे प्रश्न विचारत आहेत. पण मी आज सगळ्यांसमोर सांगतो. पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार तुम्ही दोघेही इथे आहात, तुम्ही आता सांगा तुमच्यातला मुख्यमंत्री जाहीर करा, उद्धव ठाकरेंचा त्याला पाठिंबा असेल. मी माझ्यासाठी लढत आहेत ही माझ्यात भावना नाही. मी ज्या क्षणी मुख्यमंत्रीपद सोडले, पण आता मी माझ्या स्वार्थासाठी नाही तर माझ्या महाराष्ट्रासाठी लढत आहे.
हेदेखील वाचा: ‘दिल्लीला हफ्ते द्यायचे अन् मुख्यमंत्रिपद टिकवायचे, ठेकेदारी हे तर त्यांचं सूत्रच’; संजय राऊत पुन्हा कडाडले
आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती, पण महाराष्ट्र झुकवण्याची जो हिंमत करतो त्याला आम्ही गाडून टाकतो, या इतिहासाची पुरावृत्ती आम्हाला करायची आहे. त्यामुळे कोणाचा मुख्यमंत्री होणार, हे आता तुम्ही जाहीर करा, हे आता सर्वांसमोर होऊन जाउद्या, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.