फोटो - टीम नवराष्ट्र
मुंबई : लवकरच विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राज्यामध्ये महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार तयारीला लागली आहे. घटक पक्षांनी प्रचार सुरु केला असून सभा आणि मोर्चे सुरु झाले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी आज प्रचाराचा शुभारंभ करणार असून मुंबईमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मविआचा मुंबईमध्ये मेळावा होणार असून यामध्ये सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. मुंबईमध्ये पार पडणाऱ्या या बैठकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
तीन पक्षामध्ये एकवाक्यता आहे
मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये संबोधताना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या प्रचाराची रुपरेषा सांगितली. तसेच महाविकास आघाडीच्या मेळाव्याची देखील माहिती दिली. संजय राऊत म्हणाले, “काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेचा निकाल महविकास आघाडीच्या बाजूने लागला. उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रात नरेंद्र मोदी व अमित शाह यांचा पराभव झाला. आता होणाऱ्या विधानसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढणार आहोत. आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा मुंबईत होतो आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थितीत राहणार आहेत. आजच्या मेळाव्याचं यजमान पद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्याचं पाहिलं भाषण उध्दव ठाकरे करतील. त्यानंतर तीन पक्षाचे प्रमुख नेते मार्गदर्शन करतील, तीन पक्षामध्ये एकवाक्यता आहे. जागा वाटप बाबत कोणतेही मतभेद नाहीत. शिवसेना प्रमुख उदधव ठाकरे दिल्लीत दोन दिवस होते. त्यावेळी शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी, खर्गे यांच्या सोबत बैठका झाल्या. आज आम्ही रणशिंग फुंकतो आहे, आज सुरुवात होईल, यानंतर पुढील 3 महिन्यात एकत्रित प्रचार आम्ही करू, “अशी रुपरेषा खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केली आहे.
100 कोटीला आमदार खासदार विकत घेतात
यानंतर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागले. राऊतांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहे. खासदार राऊत म्हणाले, “ज्यांचं संपूर्ण आयुष्य आमच्या पक्षात असताना सुद्धा हप्तेबाजीवरचं पोसल गेलं. हप्तेबाजी, ठेकेदारी हे त्यांच्या राजकारणाचं सूत्र राहील आणि आता इथून हप्ते गोळा करायचे आणि दिल्लीत द्यायचे. इथून हप्ते गोळा करायचे इथून थैल्या गोळा करायच्या आणि त्या थैल्या दिल्लीच्या चरणी व्हायच्या आणि आपलं मुख्यमंत्री पद टिकवायचं. अशा व्यक्तीबद्दल या महाराष्ट्राने आणि आम्ही काय बोलायचं. 50-50 कोटी आणि 100-100 कोटीला आमदार खासदार विकत घेतात, नगरसेवक विकत घेतात, न्याय विकत घेतात, कायदा विकत घेतात हे हप्तेबाजी वर होतं, हे कष्टाच्या पैशावर होत नाही,” अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
ते घरातच कुस्ती करणार
त्याचबरोबर लोकसभा निवडणूकीप्रमाणे आता विधानसभा निवडणूकीमध्ये देखील बारामतीमध्ये निवडणूकीचा धुराळा उडणार आहे. पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. विधानसभेमध्ये अजित पवार गटाकडून आता जय पवार यांना मैदानामध्ये उतरवण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार हे बारामतीसाठी नवीन ‘दादा’ म्हणून समोर आणले जाणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “अजित पवार यांना बारामतीमध्ये रस राहिला नाही कारण बारामतीच्या लोकांनी त्यांना पिळून काढला आहे. अख्खा त्यांचा रस निघाला आहे आणि ते बहुतेक पुतण्या विरुद्ध लढण्याची शक्यता आहे,कर्जत जामखेड पण घरातच लढणार. कधी बहिणी विरुद्ध कधी पुतण्याविरुद्ध ते घरातच कुस्ती करणार,” असा घणाघात संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केला आहे.






