'मुख्यमंत्री आले अन् न भेटताच गेले...'; भेट नाकारल्याने पंढरपुरात आदिवासी-कोळी समाजाकडून अनोखं निदर्शन (Agitation)
पंढरपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पंढरपूर शहरातील विविध प्रश्नासह आदिवासी महादेव कोळी जमातीच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणारे समाजसेवक गणेश अंकुशराव व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी भेटण्याचा प्रयत्न केला.
मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झाली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या आदिवासी महादेव कोळी जमातीच्या बांधवांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी लावलेल्या एका डिजिटल फलकासमोर जाऊन चक्क फलकावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला निवेदन देत अनोख्या पद्धतीने निदर्शन केलं.
यासंदर्भात बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले की, ‘आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपुरातील आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे सामान्य रुग्णालय (उपजिल्हा रुग्णालय), चंद्रभागेच्या पात्रातील, अस्वच्छता, आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक, श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचा गैरकारभार तसेच पंढरपूर नगरपरिषदेचा भोंगळ कारभार व आदिवासी महादेव कोळी जमातीच्या विविध प्रश्नांवर वारंवार आवाज उठवत आहोत. मात्र, याकडे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री लक्ष देत नाहीत.
आम्ही सर्व कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी श्रीविठ्ठल मंदिर, रेस्ट हाऊस आदी सगळीकडं रखरखत्या ऊन्हात फिरलो. मात्र, आम्हाला कुठेच मुख्यमंत्र्यांना भेटू दिलं नाही, त्यामुळं जाणुनबुजून आमच्या मागण्याकडं दुर्लक्ष होतं. आदिवासी महादेव जमातीवर शासन अन्याय करतंय हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय.
या शासनाचा आम्ही निषेध करतो आणि यासाठीच आम्ही आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे. यापुढे आमच्या मागण्यांसाठी आता आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करु, असा इशाराही यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.






