पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे ९३.३७ हेक्टर पिकांचे नुकसान
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात 13 ते 21 मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे 154 शेतकऱ्यांचे 93.7 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये आंबा, केळी, डाळींब, कांदा, शेवगा आदी पिकांचा समावेश आहे. तसेच एकलासपूर येथे तीन घरांची पडझड झाली असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
तालुक्यात 13, 15 व 19 मे झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील तावशी, तुंगत, बाभुळगाव, आढीव, रोपळे, शेटफळ, खेडभाळवणी, गादेगाव, शिरगाव, कोर्टी, बोहाळी आदी गावांतील 154 शेतकऱ्यांचे 93.37 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे एकलासपूर येथील ३ घरांची पडझड होवून नुकसान झाले असून, शिरगाव येथे अंगावर झाड पडून एक गाय दगावली. याबाबतचे पंचनामे करण्याचे कामकाज सुरु असल्याची माहिती तहसिलदार लंगुटे यांनी दिली.
तसेच 31 मेपर्यंत अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानीबाबतचे पंचनामे करुन १ जून २०२५ पर्यंत कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व ग्राम महसूल अधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश तहसिल कार्यालयाकडून देण्यात आले. तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा एकत्रित अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत शासनास सादर करण्यात येईल., असेही तहसिलदार सचिन लंगुटे यांनी सांगितले.
अरबी समुद्रात मान्सून दाखल
अरबी समुद्रात मान्सून दाखल झाला असून, येत्या दोन ते तीन दिवसात केरळमध्ये धडक देण्याची शक्यता आहे. या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: थैमान घातलं आहे. काही जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झालं असताना आता हवामान विभागाने पुढचे ६ ते ७ दिवस मुसळधार पाऊस पडण्याच्या शक्यता वर्तवली आहे. पश्चिम किनारपट्टीवरील महाराष्ट्रात कोकण, गुजरात, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.