पंढरीत राजकीय समीकरणांची चढाओढ
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एका बाजूला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर महायुती सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक व विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.
पक्षाने जबाबदारी दिल्यामुळे पक्षातील बंडखोरी रोखून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला मनसेची साथ मिळाल्याने आघाडीचा जनाधार अधिक वाढल्याचे चित्र दिसत आहे. पंढरपूरमधील नगराध्यक्षपदासाठी साधना भोसले व प्रणिती भालकेंना उमेदवारी देऊन नवा प्रयोग केला आहे.
हेदेखील वाचा : उमेदवारीसाठी इच्छुकांचे देव पाण्यात, नेत्यांच्या दरबारी उसळली गर्दी; पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीचा माहोल तापला
पंढरपूर तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष महिला उमेदवारांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी प्रणिती भालकेच्या रूपाने नवीन चेहरा मैदानात उतरवत आघाडी घेतली आहे.
36 जागांसाठी निवडणूक होणार
पंढरपूर नगरपरिषदेच्या एकूण ३६ जागांसाठी निवडणूक होणार असून, महाविकास आघाडी विजयासाठी सज्ज असल्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी प्रणिती भालके ही सुशिक्षित, ऊर्जावान आणि आत्मविश्वासू तरुणी असून, डॉक्टर शिक्षण घेत असतानाच समाजकारणाची ओढ तिने जपली आहे. प्रणिती भालके पक्षाच्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत असून, महिलांचे सक्षमीकरण, तरुणांसाठी रोजगारनिर्मिती आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा या विषयांवर तिने ठोस भूमिका घेतली आहे.
महाविकास आघाडीला शिवसेनेची साथ
पंढरपूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. आघाडीने समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले असून, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेची ही आघाडीला साथ मिळाल्याने महाविकास आघाडीचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा दावा आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या नावाने एकत्र लढवणार
पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस हे पक्ष महाविकास आघाडीच्या नावाने एकत्र लढवणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय मनसे यांनाही महाविकास आघाडीत सामावून घेण्यात येणार आहे.






