मध्यरात्री Apple Store मध्ये गोंधळ! मास्क घातला, चेहला लपवला आणि केली iPhones ची चोरी; Video Viral
अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरात एक मोठी घटना घडली आहे. मध्यरात्री चक्क येथील Apple Store मध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) च्या छाप्यांविरुद्ध सुरू असलेल्या निदर्शनांनी आता हिंसक वळण घेतले आहे. गेल्या 5 दिवसांपासून या छाप्यांविरुद्ध निदर्शनं सुरु आहेत. मात्र 9 जून रोजी रात्री निदर्शनांनी हिंसक वळण घेतले. यावेळी निदर्शकांनी डाउनटाउन लॉस एंजेलिस येथील प्रमुख रिटेल स्टोर्सनना त्यांचा निशाणा बनवला.
निदर्शकांनी लॉस एंजेलिस येथील अॅपल स्टोअरमध्ये मध्यरात्री गोंधळ घातला आणि आयफोन्सची चोरी केली. ICE ने केलेल्या कारवाईनंतर ही घटना घडली आहे. अॅपल स्टोअर, जॉर्डन फ्लॅगशिप स्टोअर, एडिडास स्टोअर, एक फार्मेसी आणि एक ज्वेलरी स्टोअरमध्ये निदर्शकांनी गोंधळ घातला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. निदर्शकांनी या दुकांनांची तोडफोड केली आणि दुकानातील सर्व सामानाची चोरी केली. (फोटो सौजन्य – X)
Apple store in downtown LA being looted tonight pic.twitter.com/3k5i7wKiSG
— Brendan Gutenschwager (@BGOnTheScene) June 10, 2025
एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये असं दिसत आहे की, मोठ्या संख्येने लोकं Apple Store मध्ये घुसले आणि त्यांनी स्टोअरच्या काचा फोडल्या. याशिवाय Apple Store मध्ये असणाऱ्या आयफोन्स आणि आयपॅडची देखील चोरी केली. या सर्वांनी चेहऱ्याला मास्क लावला होता आणि चेहरा लपवला होता. या संपूर्ण घटनेनंतर काही लोकं खिडक्या फोडून बाहेर पळताना दिसले. दुकानाच्या खिडक्यांवर ग्रॅफिटी देखील रंगवली गेली आणि महागडे इलेक्ट्रॉनिक्स सामान चोरीला गेले. एका दागिन्यांच्या दुकानाचेही मोठे नुकसान झाले. या दुकानात देखील निदर्शकांनी गोंधळ घातला आणि सर्व सामानाची चोरी केली.
लॉस एंजेलिस पोलिस विभाग (LAPD) चे अधिकारी क्रिस मिलर यांनी सांगितलं आहे की, Apple Store मधून चोरी करत असलेल्या लोकांपैकी एका आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. याशिवाय अन्य 2 लोकांना देखील चोरीच्या संशायाखाली ताब्यात घेतलं आहे. LAPD ने आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना अटक केली आहे. ज्यातील 21 लोकांना 8 जून रोजी ताब्यात घेतलं होतं. अटक करण्यात आलेल्या एकावर मोलोटोव्ह कॉकटेलने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
लॉस एंजेलिसच्या महापौर करेन बैस यांनी सांगितलं की, जे लोक शहराच्या मध्यभागी तोडफोड आणि लूटमार करत आहेत त्यांना आपल्या प्रवासी समुदायांबद्दल काहीही आदर नाही. त्यांना जबाबदार धरले जाईल.