वसई : सुपारी घेऊन खून करणे, दरोडा, जबरी चोरी, पोलीस कोठडीतून पळून जाणे असे २५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. विरार पश्चिमेला एका महिलेच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन ओढून नेण्यात आली होती. या चैन स्नॅचींग चा तपास करताना तांत्रीक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराकडील गोपनीय माहितीद्वारे गुन्हे शाखा ३ ने अनुज गंगाराम चौगुलेच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन, सोन्याची चैन असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस कोठडीत त्याची चौकशी केल्यावर आणि त्याचा पूर्व इतिहास पडताळून पाहिल्यावर त्याच्या विरुद्ध मुंबई शहर आयुक्तालय, सातारा, पालघर, मध्यप्रदेश येथे सुपारी घेऊन खून करणे, दरोडा, जबरी चोरी, पोलीस कोठडीतून पळून जाणे आणि चोरी असे २५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.
ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक अभिजीत टेलर, उमेश भागवत, हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारावकर, मनोज पाड, सचिन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, प्रविण वानखेडे, सागर सोनवणे, गणेश यादव, संतोष चव्हाण यांनी पार पाडली.