पारनेर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्याशी संबंधित भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनासह इतर संस्थांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली होती. यामध्ये माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली केल्याचा आरोप तालुक्यातील निघोज येथील लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास घावटे यांनी केला. देशातील जनतेला माहितीचा अधिकार मिळावा यासाठी मोठा संघर्ष केलेल्या हजारे यांच्याशी संबंधित संस्थांकडून पळवाट काढून माहिती दडवून ठेवली जात असल्याने धक्का बसल्याचे घावटे यांनी सांगितले.
पत्रकात म्हटले आहे की, हजारे यांच्याशी संबंधित असलेल्या राळेगणसिद्धी येथील भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास, स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी, हिंद स्वराज ट्रस्ट व आदर्श ग्रामीण सहकारी पतसंस्था यांच्याकडून लोकजागृती संस्थेच्या वतीने या संस्थांचे गेल्या दहा वर्षांतील लेखापरीक्षण अहवाल व इतर माहिती मागवण्यात आली होती. मात्र, सरकारी अनुदान प्राप्त होत नसल्याने या संस्था माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नसल्याचे कळवताना माहिती देण्यास नकार दिल्याचे घावटे यांनी म्हटले आहे. राळेगणसिद्धी ग्रामपंचायत व श्रीसंत यादवबाबा शिक्षण प्रसारक संस्थेकडूनही माहिती मागवण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप उत्तर मिळाले नाही असे घावटे यांनी म्हटले आहे.
संशय बळावला…
पारनेर व श्रीगोंदे तालुक्यातील टॅंकर घोटाळ्यासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील काही संशयित राळेगणसिद्धी येथील उपरोक्त संस्थांचे पदाधिकारी आहेत. या संशयित आरोपींनी टॅंकर घोटाळ्यातील काही रक्कम उपरोक्त संस्थांकडे वळवली असल्याचा संशय लोकजागृती सामाजिक संस्थेला आहे. त्यामुळे संबंधित संस्थांकडून माहिती मागवण्यात आली होती. हजारे यांच्या संस्थांमधील कारभार पारदर्शक असेल, असा सार्वत्रिक समज आहे .मात्र, या समाजाला धक्का बसला आहे. माहिती नाकारल्याने टॅंकर घोटाळ्यातील रक्कम संबंधित संस्थांकडे वळवल्याचा आमचा संशय बळावला आहे.