
Wai Encroachment Drive, Sanjeevani Dalvi Chief Officer,
वाई शहरात वाढती वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांविरोधात नगरपरिषदेची धडक मोहीम
मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्या आदेशाने अतिक्रमणविरोधी पथकाकडून धडक कारवाई
किसनवीर चौक, गणपती आळी व भाजी मंडई परिसरातील अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्ज जप्त
Wai Encroachment Drive: शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत अतिक्रमणे आणि विनापरवाना फ्लेक्सच्या विळख्यात अडकलेल्या वाई शहराला मोकळा श्वास देण्यासाठी नगरपरिषदेने अखेर धडक कारवाईला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्या आदेशाने नगरपरिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी शहरातील विविध भागांत कारवाई करत विनापरवाना फ्लेक्स, फलक व होर्डिंग्ज हटविले. तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत टपऱ्या, लोखंडी बॅरिकेड्स, गटारांवरील अनधिकृत बांधकामे आणि रस्त्यावरील अडथळा ठरणारे पार्किंग यांवरही कारवाई करण्यात आली.
शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, मुख्य रस्ते तसेच महामार्गाला जोडणाऱ्या मार्गांवर परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या फ्लेक्स आणि फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत होते. त्याचबरोबर रस्त्यांच्या कडेला अनधिकृतपणे उभारलेल्या टपऱ्या आणि दुकानांसमोरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असल्याने नगरपरिषद प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत कारवाईचा निर्णय घेतला.
Madhuri Elephant Vantara To Kolhapur: ती पुन्हा आली…! 13 महिन्यांच्या लढ्यानंतर माधुरी हत्तीणीचे
किसनवीर चौक, गणपती आळी, भाजी मंडई परिसर तसेच महामार्गाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर नगरपरिषदेच्या पथकाने धडक देत विनापरवाना फ्लेक्स व फलक हटविले. वाहतुकीच्या मार्गावर अतिक्रमण करून उभारलेल्या काही अनधिकृत टपऱ्यांवरही कारवाई करून त्या जप्त करण्यात आल्या. काही दुकानदारांनी दुकानांसमोर लोखंडी बॅरिकेड्स उभारून गटारांवर अतिक्रमण केले होते; तसेच दुकानांसमोरील रस्ता अडवून अनधिकृत वाहन पार्किंगची व्यवस्था केली होती. अशा ठिकाणीही नगरपरिषद पथकाने कारवाई केली.
“रस्ते, चौक आणि सार्वजनिक जागा या कोणाच्याही खासगी मालमत्ता नसून त्या सर्वसामान्य नागरिकांच्या वापरासाठी आहेत. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांनी तसेच विनापरवाना फ्लेक्स व फलक लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांनी नियमांचे पालन करावे,” असा स्पष्ट इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.
वाई शहराचे ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेता शहराचे सौंदर्य टिकविणे, सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवणे आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे आवश्यक आहे. त्याच भूमिकेतून ही मोहीम सुरू करण्यात आली असून, यापुढेही शहरातील अतिक्रमणांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, शहरातील पार्किंगचा प्रश्नही गंभीर असल्याने नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर न लावता उपलब्ध अधिकृत जागेत पार्क करावीत, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. केवळ कारवाई करून प्रश्न सुटणार नसून नागरिकांनीही वाहतूक शिस्त आणि सार्वजनिक जागांचा वापर याबाबत जबाबदारीने वागण्याची गरज आहे.
या कारवाईत नारायण गोसावी, कोमल मधुकर साबळे (स्थापत्य नगर अभियंता तथा पथक प्रमुख), अनंत प्रभुणे (स्थापत्य अभियंता तथा पथक प्रमुख), सर्वेश खाडे (सहाय्यक पथक प्रमुख), मनोज बारटक्के (अधिकारी), विजय मारोडा (स्वच्छता निरीक्षक), चंद्रकांत अडसूळ, राहुल शिंदे, यश पवार, आदित्य कांबळे, प्रसाद पाटोळे, सागर लाड, कैलास लाड, रोहित गाढवे, राजेंद्र चौगुले, अमोल रोकडे, प्रमोद जाधव, रवींद्र काळोखे आणि आयुष लाड यांनी सहभाग घेतला.
कास पुष्प पठारावर शनिवार-रविवारी एकेरी वाहतूक; 31 ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीत बदल
नगरपरिषदेच्या या कारवाईचे शहरातील नागरिकांकडून स्वागत होत असून, ही मोहीम केवळ एक-दोन दिवसांपुरती मर्यादित न ठेवता सातत्याने राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रस्ते आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्याच्या या मोहिमेमुळे ‘नियम मोडाल तर कारवाईला सामोरे जावेच लागेल’, असा स्पष्ट संदेश अतिक्रमणधारकांना मिळाला आहे.
टपरीधारकांच्या पोटावर पाय येणार नाही; हॉकर्स झोनचा मार्ग काढणार
“वाई शहरातील पार्किंगचा प्रश्न गंभीर असून रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहनधारकांनी आपली वाहने रस्त्यावर न लावता योग्य पार्किंगच्या जागेत उभी करावीत. मात्र, हातावर पोट असलेल्या छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करताना त्यांच्या उपजीविकेचा प्रश्नही लक्षात घेतला जाईल. रस्त्याच्या कडेला टपऱ्या लावून व्यवसाय करणाऱ्या नागरिकांसाठी हॉकर्स झोन तयार करून त्यांच्या उपजीविकेचा मार्ग काढण्यात येणार आहे. कोणाच्याही पोटावर पाय येणार नाही आणि कोणावरही उपासमारीची वेळ येणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.”
— अनिल सावंत (लोकनियुक्त नगराध्यक्ष, वाई)