Hinganghat News: पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी! विदर्भातील सर्वांत मोठ्या हेरॉनरीत यंदा २ नव्या पाणपक्षी प्रजातींची घरटी
आतापर्यंत या विणवसाहतीत छोटा बगळा, गाय बगळा, रातढोकरी, छोटा पाणकावळा आणि भारतीय पाणकावळा या ५ पाणपक्षी प्रजाती नियमितपणे प्रजननासाठी घरटी बांधत होत्या. मात्र, यंदा प्रथमच मध्यम बगळा आणि मोठा बगळा या २ प्रजाती परिसरात दिसून आल्याने त्या येथे घरटी बांधतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरत दोन्ही प्रजातींनी येथे यशस्वीपणे घरटी बांधली आहेत. (फोटो सौजन्य – AI Created)
या उल्लेखनीय नोंदीबद्दल पक्षी अभ्यासक राहुल वकारे, एम. एस. आर. शाद, अशोक भानसे, पंचशील थुल, ज्ञानचंद गहरवाणी, पवन दरणे, चित्रा इंगोले, प्रमोद इंगोले, यशवंत शिवणकर, प्रशांत भोयर, समीर बक्ष, शेखर जामूनकर, संतोष धनरेल, गणेश पोलकडे, अमित जोगे यांच्यासह विदर्भातील अनेक पक्षी अभ्यासकांनी आनंद व्यक्त केला. हिंगणघाटकरांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, पक्ष्यांच्या शांततापूर्ण व सुरक्षित प्रजननासाठी विणवसाहतीच्या परिसरात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वन विभागाने डीजे, फटाके आणि इतर मोठ्या आवाजाच्या साधनांवर निर्बंध घालावेत, अशी मागणी निसर्गप्रेमी व पक्षी अभ्यासकांनी केली आहे.
निसर्गसाथी ग्रुपचे पक्षी अभ्यासक प्रवीण कडू यांनी सांगितले की, या दोन्ही नव्या प्रजातींनी हिंगणघाटच्या विणवसाहतीची निवड केल्याने हा परिसर त्यांच्या दृष्टीने सुरक्षित, शांत आणि प्रजननासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे या विणवसाहतीचे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्व आणखी वाढले आहे. ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या निरीक्षणादरम्यान मध्यम बगळ्याची पिले घरट्याबाहेर आल्याचे, तर मोठा बगळा अद्याप अंड्यांवर बसून उबवणी करत असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही प्रजातींचे यशस्वी प्रजनन होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.






