
आश्रमशाळेत क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी, ६० टक्केच हजेरी
Wardha News : वर्धा जिल्ह्यात दोन शासकीय निवासी आदिवासी आश्रम शाळा आहेत. या दोन्ही शाळांची एकूण विद्यार्थी क्षमता तब्बल १ हजार २०० इतकी आहे. पण प्रत्यक्षात या शासकीय निवासी आदिवासी आश्रम शाळांमध्ये सध्या केवळ ५९.४१ टक्केच विद्यार्थी असल्याचे वास्तव आहे. आदिवासी समाजातील मुल-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपयुक्त असलेल्या आश्रम शाळांत विद्यार्थ्यांची संख्या वाढावी याकरिता विशेष प्रयत्न करण्याची जबाबदारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या कार्यालयाची आहे. मात्र, कार्यालयातील जबाबदार अधिकारी सध्या उंटावरून शेळ्या हाकलत असल्याचे आणि बड़े अधिकारी नियमित आश्रम शाळांना भेटी देत नसल्याची ओरड होत आहे.
आदिवासी समाजात अजूनही शिक्षणाचा अभाव दिसून येतो. काही बेडे आणि तांड्यावरील मुल मुलींची आई-वडील रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर काहींची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने ते पालक आपल्या पाल्यांना साधे शाळेत पाठवू शकत नसल्याचे वास्तव आहे. याच पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी पोलिस विभागाच्यावतीने पारधी समाजातील कुटुंबीयांचे जीवनमान उंचावे या हेतूने पारधी समाजातील महिलांना फिनाइल तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. पण तत्कालीन पोलिस अधीक्षकांची बदली झाल्यावर हा महत्त्वाकांशी प्रकल्प जणू गुंडाळल्यात गेला.
आदिवासी समाजातील मुले-मुली शिक्षित व्हावे, याकरिता उपयुक्त ठरणाऱ्या शासकीय निवासी आदिवासी आश्रम शाळांमध्ये विद्यार्थी संख्याच रोडावत असल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यात देवळी तालुक्याच्या हिरापूर तर आष्टी तालुक्याच्या पांढुर्णा या दोन ठिकाणी शासकीय आदिवासी निवासी आश्रम शाळा आहेत. या दोन ठिकाणची विद्यार्थी क्षमता १ हजार २०० इतकी असली तरी सध्या या दोन्ही आश्रम शाळेत केवळ ७१३ विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रम शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढावी, याकरिता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्यावतीने विशेष प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा नागरिकांना आहे.
देवळी तालुक्यातील हिरापूर येथील शासकीय आश्रम शाळेची विद्यार्थी क्षमता ६०० इतकी आहे, पण सध्या तेथे एकूण ३७७ विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले. यात १७६ मुले तर २०१ मुलींचा समावेश आहे. या आश्रम शाळेत ३६२ निवासी विद्यार्थी असून १४ अनिवासी विद्यार्थी तसेच १ विनासवलत विद्यार्थी आहे.
आष्टी तालुक्यातील पांढुर्णा येथील शासकीय आश्रम शाळेची एकूण क्षमता ६०० विद्यार्थी इतकी आहे. पाण प्रत्यक्षात या शाळेत केवळ ३३६ विद्यार्थी आहेत. यात २०८ मुले तर १२८ मुलींचा समावेश आहे. या शाळेत २९५ निवासी, ३७ अनिवासी तर ४ विना सवलत विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले,