
वर्धा : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १.१९ लाख हेक्टरवर सोयाबीन तर २.३१ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. पण वाढीच्या अवस्थेत असलेल्या या दोन्ही पिकांवर सध्या किड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पूर्वीच जिल्ह्यात पावसाचा खंड कायम असून आता कपाशी व सोयाबीन पिकावर किड-रोगाचा प्रादुर्भाव पिकांवर झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे.
जिल्ह्यात जून ते आतापर्यंत ४४६.४ मिमी पाऊस झाला आहे. यंदा सुरुवातीला पाऊस लांबणीवर गेल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. तर नंतर पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला गती दिली. यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात ४.१८ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी विविध पिकांची लागवड केली आहे. पावसाचा खंड जिल्ह्यात कायम असल्याने अंकुरलेले आणि वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना जगविण्यासाठी तारेवरचीच कसरत करावी लागत आहे. अशात जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असल्याने पिकांवर त्याचा विपरित परिणाम होत आहे.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १,१९,६२६ हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. सध्या बहुतांश भागातील सोयाबीन पीक १ ते १.५ फुट उंचीचे झाले असून सोयाबीन पीक फुलोरा व वाढीच्या अवस्थेत आहे. तर याच पिकावर सध्या अल्प प्रमाणात का होईना पण चक्रीभूगा, खोडमाशी, तंबाखूची पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
२.३१,९६१ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. सध्या वाढीच्या अवस्थेत असलेले कपाशी पीक १.५ ते २ फुट उंचीचे झाले आहे. तर काही ठिकाणी हे पीक पाती, फुले धारणा अवस्थेत आहे. पण या पिकावर सद्या काही ठिकाणी अल्प प्रमाणात मावा, तुडतुडे, पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने कापूस उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे.
यावर बोलताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर म्हणाले, “सोयाबीन पिकावर चक्रीभूगा, खोडमाशी, तंबाखुची पाने खाणारी अळी तर कपाशीवर मावा, तुडतुडे, पाढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांनी कृषी विभागाच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत किड रोगाचे व्यवस्थापन करावे.