फोटो सौजन्य - Social Media
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक देवरहाटी व गावरहाटीच्या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या असून, या जमिनी तत्काळ देवस्थानच्या नावे करण्यात याव्यात, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने देण्यात आला. चिपळूण येथे पार पडलेल्या जिल्हा अधिवेशनात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी हा इशारा दिला.
चिपळूण येथील स्वामी मंगल कार्यालयात २४ फेब्रुवारी रोजी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशनाचे उद्घाटन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, स्वामी स्वरुपानंद सेवामंडळ पावसचे कार्याध्यक्ष जयंत देसाई, उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजक ह.भ.प. अभय महाराज सहस्त्रबुद्धे, निवृत्त सह धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख, अधिवक्ता जनार्दन करपे आणि सुनील घनवट यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. जिल्हाभरातील ४५० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त व प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित होते.
या वेळी सुनील घनवट यांनी मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात मोठ्या आंदोलनाची तयारी करण्याचे आवाहन केले. “मंदिर संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी संघटन महत्त्वाचे आहे. सरकार मंदिरांच्या मालमत्तेवर ताबा मिळवत आहे, याला विरोध करण्यासाठी आम्हाला रत्नागिरी पॅटर्न उभा करायचा आहे,” असे ते म्हणाले. सद्गुरु सत्यवान कदम यांनी मंदिर संस्कृतीच्या जतनाविषयी भाष्य केले. “मंदिरांमुळे हिंदू संस्कृती टिकून आहे. मात्र, तीर्थक्षेत्रे आता केवळ पर्यटनस्थळे बनली आहेत. मंदिरांतून धर्मशिक्षण दिले गेले तर श्रद्धा वाढेल आणि देशासाठी समर्पित पिढी घडेल,” असे त्यांनी सांगितले.
निवृत्त धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करताना मंदिर व्यवस्थापन आणि न्यास नोंदणी प्रक्रियेबाबत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. अधिवक्ता जनार्दन करपे यांनी मंदिरांना येणाऱ्या कार्यालयीन अडचणींबाबत मार्गदर्शन केले. जयंत देसाई यांनी मंदिर रक्षणासाठी राजाश्रय मिळवण्याची गरज व्यक्त केली. “मंदिरांसाठी कार्य करणाऱ्या संघटनांना बळकट करणे आवश्यक आहे. श्रद्धाळूंनी सेवा भावनेने मंदिर व्यवस्थापनात सहभाग घ्यावा,” असे ते म्हणाले.
या वेळी संजय जोशी यांनी मंदिर संरक्षणासाठी जुगार व इतर अपप्रवृत्ती बंद करण्याचे आवाहन केले. “सामूहिक आरती, गदा पूजन, गुढीपूजन यासारखे उपक्रम राबवून मंदिर संस्कृती जोपासूया,” असे ते म्हणाले. यावेळी दिलीप देशमुख, निवृत्त धर्मदाय आयुक्त, महेश पोंक्षे , महाराष्ट्र मंदिर महासंघ, चिपळूण तालुका संयोजक, रमेश कडू, महाराष्ट्र मंदिर महासंघ, दापोली आणि मंडणगड, लक्ष्मण गुरव, महाराष्ट्र मंदिर महासंघ, दापोली तालुका संयोजक, उमेश गुरव, सकल गुरव समाज संघटना, सुभाष गुढेकर, कृष्णा पंडित, गणेश उतेकर, प्रदीप चव्हाण, दीपक कदम- महाराष्ट्र मंदिर महासंघ जिल्हा कार्यकारिणी सदस्य आदी उपस्थित होते.