
Washim Zero Nipun Schools
वाशिम: जिल्ह्यातील प्रत्येक बालकाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान आत्मसात करणे आवश्यक असून, ‘शून्य निपुण’ असलेल्या शाळांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करून प्रभावी उपाययोजना कराव्यात. केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांनी अशा शाळा दत्तक घेऊन नियमित वर्ग निरीक्षण व मार्गदर्शन करावे. शून्य निपुण शाळांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
Buldhana: सोयाबीन काढणीला वेग; मध्य प्रदेशातून हजारो मजूर दाखल, स्थानिक मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट, वाशिम आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सुकाणू समितीचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान तसेच सुकाणू समितीचे सचिव डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र महाजन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विठ्ठल भुसारे, डायट अधिव्याख्याता डॉ. राजेश गवई, शिवाजी साखरे, सय्यद, उपशिक्षणाधिकारी कृष्णा बिरादार, वेनगुलवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पाश्र्वभूमीवर २९१ ‘शून्य निपुण’ शाळांसाठी विशेष टास्क फोर्स कार्यरत करून गटशिक्षणाधिकाऱ्यांचे थेट उत्तरदायित्व निश्चित करण्यात आले आहे. केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी या शाळा दत्तक घेऊन दर आठवड्याला प्रत्यक्ष वर्ग निरीक्षण व मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सांगितले.
निपुण महाराष्ट्र’ अहवालानुसार, वाशिम जिल्ह्यातील ७९५ प्राथमिक शाळांमधील ४२ हजार ५४९ विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्याची निपुण सरासरी १७.३ टक्के असून, ७ हजार ३६२ विद्यार्थी निपुण ठरले आहेत. जिल्ह्यातील २९१ शाळांमध्ये महणजेच ३६.६ टक्के शाळांमध्ये एकही विद्यार्थी निपुण नसल्याचे निदर्शनास आले. तालुकानिहाय कामगिरीमध्ये कारंजा लाड २६.६ टक्के आणि वाशिम २२.५ टक्के या तालुक्यांतील कामगिरी आघाडीवर आहे. मानोरा ८.८ टक्के आणि रिसोड १०.७टक्के हे तालुके मागे आहेत. मानोरा तालुक्यातील तब्बल ५० टक्के शाळांमध्ये निपुणता शून्य आहे.
१०० टक्के निपुण ठरलेले अफझलपूर विद्यालय, मंगरूळपीर आणि ९८.३३ टक्के निपुणता मिळवणारी कंकुबाई कन्या शाळा, कारंजा यांच्या अध्यापन विशेष पद्धतींचा इतर शाळांनी आदर्श घ्यावा, असेही त्यांनी निर्देशित केले. या शाळांमध्ये राबविण्यात येणारे ‘वाचन कट्टा’ आणि ‘संख्या पेटी’ हे उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरले आहेत. माहितीचे सादरीकरण डॉ. महाजन यांनी केले. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सुकाणू समिती सदस्य, निवडक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी यासह तज्क्ष शिक्षक विश्वंभर आळणे उपस्थित होते.