
बाळापूर तालुक्यात पाणीप्रश्न बिकट
बाळापूर येथील बायपास रोडने राष्ट्रीय महामार्गावरील मन नदीच्या पुलावरून गेल्या दोन दिवसांपासून क्रेनच्या सहाय्याने माँ दुगार्देवीचे विसर्जन करण्यात येत आहे. बाळापूर येथे अकोला जिल्ह्यासह शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यातूनही शेकडो गणेश व देवी मंडळ विसर्जनासाठी येत असतात. आधीच तीव्र पाणीटंचाई आणि जलपर्णीमुळे संकटात सापडलेल्या मन नदीपात्रात शेकडो मोठ्या मूर्तीचे विसर्जन झाल्याने परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. मूर्तीचा आकार मोठा असणे आणि नदीत आवश्यक तेवढा जलसाठा उपलब्ध नसल्याने अनेक देवींच्या मूर्त्या पाण्यावर तरंगताना किंवा अर्धवट बुडालेल्या स्थितीत दिसून येत आहेत.
तसेच, नऊ दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर जमा झालेले निर्माल्य थेट नदीपात्रातच टाकले जात असल्यामुळे पात्रात सर्वत्र अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या सर्व गंभीर परिस्थितीवर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. आमच्या भागात आधीच १०-१० दिवस नळाला पाणी येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. त्यातच मन नदी पाण्याची पातळी कमी होतं चालली आहे. विसर्जनामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाण आणि निर्माल्य साचले आहे. प्रशासनाने तातडीने वाकडे लक्ष देऊन नदीपात्राची स्वच्छता करावी, अन्यथा येत्या काळात आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाकडून उपाययोजनांची गरज
पाण्याचा तुटवडा असतानाही योग्य पर्यायी व्यवस्था न केल्याने भविष्यातील पाणी संकट अधिक गडद होणार आहे. सध्याची ही परिस्थिती पाहता, आगामी उन्हाळ्यात बाळापूर तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे भूजल पातळी झपाट्याने खाली जात आहे, तर दुसरीकडे नद्यांचे प्रदूषण वेगाने वाढत आहे. त्यामुळे मन नदीपात्रातील जलपर्णी तातडीने काढणे, विसर्जनस्थळावरील साचलेला निर्माल्य व कचरा साफ करून नदीची स्वच्छता मोहीम राबवणे आणि भविष्यातील पाणी संकट टाळण्यासाठी जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेणे गरजेचे झाले आहे. स्थानिक प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र जनक्षोभ उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
1. बाळापूर तालुक्यात सध्या कोणती समस्या निर्माण झाली आहे?
तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
2. बाळापूर तालुक्यातील कोणत्या नद्या महत्त्वाच्या आहेत?
मन, महेश आणि भिकुंड या तीन प्रमुख नद्या तालुक्यासाठी महत्त्वाच्या आहेत.
3. तलाव आणि बंधाऱ्यांची स्थिती काय आहे?
मन नदीवरील दोन प्रमुख धरणे वगळता परिसरातील बहुतांश छोटे बंधारे आणि तलावांनी तळ गाठला आहे.