गॅस टंचाईचा असाही बसतोय फटका; लग्न सोहळे होईना नियोजित वेळेत (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
पुणे : आंबेगाव तालुक्यात गॅस टंचाईमुळे होणारे लग्न सोहळे देखील आता अडचणीत आले आहेत. लग्न सोहळ्यात होणाऱ्या जेवणावळीसाठी गॅसची नितांत गरज असून, स्वयंपाक बनवण्यासाठी गॅस मिळत नसल्याने गॅस टंचाईचे संकट देखील आता लग्न सोहळ्यात अडचणीचे ठरू लागले आहे.
इस्त्राइल आणि अमेरिका विरुद्ध इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आणि गॅस पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला असल्याचे दिसून येते. त्यामुळे व्यावसायिकांना गॅस टाकीचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे उपहारगृह, खानावळ या व्यवसायांसह आता लग्न समारंभ कार्यालयांवर देखील आता याचा फटका बसू लागत्याचे दिसून येते. काहींकडून तर गॅस तुमचा आणि स्वयंपाक आमचा अशीच अट घातली जाऊ लागली आहे.
LPG संकटावर सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’! आता काही मिनिटांत मिळवा गॅस सिलेंडर, जाणून घ्या सविस्तर
लग्न सोहळ्यासाठी एप्रिल आणि मे महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दोन महिन्यात लग्नाचे सर्वाधिक मुहूर्त असतात. यंदाच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये एप्रिल महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त पाच आहेत. तर मे महिन्यात नऊ मुहूर्त आहेत. यासह काही काढीव मुहूर्त देखील आहेत. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात सर्वाधिक लग्न सोहळे पार पडत असतात. या लग्न समारंभासाठी वर आणि वधू यांच्या कुटुंबीयांकडून दोन ते तीन महिने आधीच मंगल कार्यालयाच्या हॉलची नोंदणी केली जाते. त्यानुसार, तालुक्यात सुमारे 100 ते 200 लोकांच्या क्षमता असलेल्या हॉल पासून ते अगदी हजार ते दोन हजार लोकांच्या हॉलमध्ये एप्रिल आणि मे या दोन महिन्यातील लग्न सोहळ्याची नोंदणी झालेली आहे.
दरम्यान, गॅस वाचवण्यासाठी आचाऱ्यांकडून लग्नाच्या पदार्थांमधील संख्या कमी केली जात आहे. तर या गॅस टंचाईचा फायदा घेत बाजारात गॅसचा काळाबाजार होत असल्याची देखील चर्चा आहे. अर्थात गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांनी आपले दर दुप्पट-तिप्पट केल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे लग्न सोहळ्याचे आर्थिक बजेट वाढल्यामुळे सामान्य कुटुंबाचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लग्नसराईच्या काळात तरी गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अशी सर्वसामान्य नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येते.
सामान्य नागरिकांना सध्या गॅसचा पुरवठा योग्यप्रकारे अपेक्षित असून वेळेवर गॅस मिळत नाही, त्यामुळे काळ्या बाजारांनी गॅसची टाकी घ्यावी लागते. मात्र, ही बाब सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरील आहे. संबंधित प्रशासनाने काळाबाजार रोखण्यासाठी योग्य पावले उचलून गॅसचा होणारा काळाबाजार तात्काळ थांबवा अशी अपेक्षा जाधववाडी (ता.आंबेगाव) येथील उपसरपंच संपतराव जाधव यांनी व्यक्त केली.






