पालघर – सोमवारी जयपूर ते मुंबई पॅसेजर एक्सप्रेसमध्ये (jaipur to mumbai passenger express) एक धक्कादायक घटना घडली. चेतन या माथेफिरु पोलीस कॉन्सटेबलने गोळीबार केला. या गोळीबारात एका पोलिसांसह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. पालघर ते विरारदरम्यान (Palghar to viriar) हा गोळीबार झाला आहे.दरम्यान, या घटनेचा जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांकडून तपास सुरु आहे. या घटनेमुळं एकच खळबळ माजली असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबल चेतनला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याने गोळीबार का केला? त्यामागचं कारण काय? नेमकं काय घडलं होतं? असे सवाल त्याला करण्यात येत आहेत. गोळीबार करत असताना चेतनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, या व्हिडिओत तो मोदी व योगींच्या नावाने घोषणा देत असल्याचं प्रत्यक्षदर्शीनं म्हटलं आहे. या घटनेवरुन विरोधकांनी खासकरुन काँग्रेसनी मोदी सरकारवर टिका केली आहे. (Congress Vs Modi)
जे पेरलं तेच उगवेल…
दरम्यान, पालघरच्या घटनेवरुन विरोधक आक्रमक झाले असून, त्यांनी मोदी सरकारवर टिका केली आहे, गोळीबार करत असताना चेतनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, या व्हिडिओत तो मोदी व योगींच्या नावाने घोषणा देत असल्याचं प्रत्यक्षदर्शीनं म्हटलं आहे. यावरुन विरोधकांनी भाजपा व मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “मागील ९ वर्षात द्वेषाचं जे बीज पेरलं ही त्याचीच फळं आहेत मोदीजी. एका RPF च्या जवानाने आपल्या वरिष्ठाची आणि ३मुसलमानांची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो बोलत होता की जर भारतात राहायचं असेल तर फक्त मोदी आणि योगी. द्वेषाचं राजकारण करून मड्यावरचं सत्तेचं लोणी अजून किती दिवस…” असं ट्विट महाराष्ट्र काँग्रेसनं केलं असून, मोदींवर टिका केली आहे.
चेतन सिंहने पाहिलेला 26-11 चा व्हिडीओ
चेतन सिंह या आरोपीनं 26-11चा व्हिडीओ रात्री पाहिला असल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर त्यानं पहिल्यांदा वरिष्ठ अधिकाऱ्याला गोळी मारली आणि नंतर तिघांना मारलंय. यात दोघांची ओळख पटली असून दोघेही मुस्लीम आहेत. मृत प्रवाशांची नावं अब्दुल कादर मोहम्मद हुसैन भानपुरावाला ( वय 50), , अख्तर अब्बास अली(वय 48 )अशी नवे आहेत. तिसराही प्रवासी मुस्लीम असण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात येत आहे. चेतन याचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते, त्याच्यावर व्हिडीओचा परिणाम होता, त्याची आता नुकतीच बदली झाली होती, त्यामुळं नाखूश होता, कौटुंबिक वाद होता, गरम डोक्याचा होता असे अनेक मुद्दे आता समोर येत आहेत.






