मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहेत, तर अजितदादा गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटाला मंत्रिपद मिळणार की नाही, याबाबत सगळ्यानाच उत्सुकता आहे. दरम्यान, राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. काल रात्री (सोमवारी) उशिरा मंत्रीमंडळ विस्तार व खातीवाटप याबाबत शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात तब्बल दिड तास बैठक चालली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) उपस्थित होते. यानंतर राजकीय हालचालीना वेग आला आहे.
विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी…
दरम्यान, विरोधी पक्षनेतेच आता सत्तेत सहभागी झाल्यामुळं राज्यातील विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहेत, तर अजितदादा गटाकडे ३० ते ३५ आमदारा असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं ५४ पैकी जर ३५ आमदार गेले तर १९ आमदार शरद पवारांसोबत राहतात. उद्धव ठाकरेंकडे १६ आमदार आहेत, काँग्रेसकडे ४४ आमदार असल्यानं काँग्रेसचे संख्याबळ अधिक आहे, त्यामुळं विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसची वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे.
विजय वडेट्टीवार नवे विरोधी पक्षनेते
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते बनण्याची शक्यता असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे. सभागृहात आता काँग्रेस आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे संख्याबळ पाहता काँग्रेसचा विरोधी पक्षनेता व्हावा, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांची आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. कारण काँग्रेसकडे सर्वांधिक ४४ आमदार आहेत. त्यामुळं ज्यांचे संख्याबळ अधिक त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळते. यामुळं या अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदाच्या भूमिकेत हे विजय वडेट्टीवार दिसल्यास नवल वाटायला नको.
याच आठवड्यात मंत्रीमंडळ विस्तार
राज्याच्या राजकारणात अतिशय वेगाने घडामोडी घडताहेत. रविवारी (२ जुलै) राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीतून (NCP) काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. यानंतर ९ मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. पण यांना कोणती खाती दयाची याबाबत अजून नक्की झाले नसल्यानं कालच्या बैठकीत यावर खलबतं झालं. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. तसेच मंत्रीमंडळ विस्तार व खातीवाटप याबाबत शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात चर्चा होत असून, राजकीय घडामोडींना वेग आला असून, याच आठवड्यात किंवा पावसाळी अधिवेशनाच्या आधी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.