रविंद्र माने-वसई : ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत नील कामतची भूमिका साकारणारा घराघरात स्थान मिळवलेल्या नालासोपारातील उदयोन्मुख कलाकार आयुष भिडे हा ‘प्रेमाची गोष्ट’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आपल्या अभिनयाने, विविध भूमिका साकारून आयुषने घराघरात स्थान मिळवलं आहे. नाटक आणि अभिनयाचा वारसा वडिल आशिष भिडे यांच्याकडून लहानपणापासूनच मिळत असल्यामुळे आयुष लवकरच परीपक्व झाला.
वयाच्या १४ व्या वर्षापासून त्याने त्याच्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली. अनेक एकांकिका, प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमध्ये काम करत त्याने अनेक पारितोषिकं पटकावली. फक्त मराठीच नाही तर हिंदी नाटकासाठी सुद्धा त्याने पारितोषिकं मिळवली. अनेक एकांकिकांचं दिग्दर्शनही त्याने केलं. अनेक कलाकृतींचं डबिंग करून त्याने त्याच्या आवाजाने वेगळी ओळख निर्माण केली. इतकंच नव्हे तर ‘द मॅड बॉईज’ आणि ‘सिनेमो स्टुडिओ’ ही दोन युटयुब चॅनेल्स ही त्याने सुरु केली आहेत.
वडील आशिष यांच्या स्मरणार्थ ‘कलामंच’ या संस्थेची ही त्याने स्थापना केली. २०२१ मध्ये स्टार प्रवाह वरील ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत निराजी रावजी पंत ही भूमिका साकारत त्याने मालिका विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत खलनायक नील कामतची भूमिका साकारून त्याने आपली वेगळी छाप निर्माण केली. आजही नील कामत ही भूमिका सगळ्यांच्या मनात कोरली गेली आहे.
‘रंग माझा वेगळा’, ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘शुभ विवाह’ या मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता पुन्हा नव्याने तो स्टार प्रवाहवर ४ तारखेपासून सुरु झालेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या नवीन मालिकेत ‘लकी’च्या आगळ्या वेगळ्या भूमिकेतून सगळ्यांच्या भेटीस आला आहे. वेगवेगळ्या मालिकांमध्ये साकारलेल्या भूमिका आयुष भिडे याचा, ‘लकी’ ही भूमिका सगळ्यांना नक्कीच आवडेल. या भुमिकेलाही योग्य न्याय देऊन आयुष पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करेल असा विश्वास जेष्ठ रंगकर्मी शांताराम वाळींजकर यांनी व्यक्त केला आहे.