इस्रायल-इराण संघर्षानंतर नवे डावपेच: इराणने अनेक देशांत शस्त्रास्त्र कारखाने उभारल्याचा दावा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Iran-Israel War : इस्रायलमध्ये युद्धकैदी व ओलिसांच्या सुटकेसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. हजारो आंदोलकांनी सरकारकडे युद्धबंदी कायम ठेवण्याची आणि बंदिवानांची सुटका करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर इराणने एक धक्कादायक दावा केला आहे. इराणचे संरक्षण मंत्री अझीझ नासेरजादेह यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या देशाने अनेक राष्ट्रांमध्ये शस्त्रास्त्र कारखाने उभारले आहेत. जरी त्यांनी त्या देशांची नावे उघड केली नाहीत, तरी संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे कारखाने सीरिया, लेबनॉन, इराक आणि येमेनमध्ये असू शकतात.
इराणच्या मते, इस्रायलसोबत झालेल्या ताज्या संघर्षानंतर त्यांच्या संरक्षण धोरणात मोठा बदल झाला आहे. “आमचे प्राधान्य आता फक्त क्षेपणास्त्र विकास नाही, तर विविध प्रकारच्या युद्धसामग्रीत आहे,” असे नासेरजादेह म्हणाले. त्यांच्या दाव्यानुसार, इस्रायलने 12 दिवसांच्या युद्धकाळात त्यांच्यावर जबरदस्त हल्ले केले, अगदी संरक्षण मंत्रालयालाही लक्ष्य केले. ते पुढे म्हणाले, “जर हे युद्ध आणखी तीन दिवस, म्हणजेच 15 दिवस चालले असते, तर इस्रायलने नक्कीच शरणागती पत्करली असती. अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्ध थांबवले, अन्यथा परिस्थिती अधिक गंभीर झाली असती.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ceasefire Now : ‘करार शक्य आहे, पण वेळ कमी’; तेल अवीवच्या रस्त्यांवर जनतेचा एल्गार, इस्रायलमध्ये वाढता दबाव
इराणने अलीकडेच नव्या प्रकारच्या वॉरहेड्स आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. नासेरजादेह यांनी सांगितले की, त्यांच्या ‘कासिम बसीर’ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची क्षमता 1200 किलोमीटरपर्यंत आहे. मात्र, इस्रायलसोबतच्या संघर्षादरम्यान त्यांनी हे क्षेपणास्त्र वापरणे टाळले. 21 ऑगस्ट रोजी ओमानसोबत झालेल्या लष्करी सरावात इराणच्या नौदलाने उत्तर हिंद महासागरात क्रूझ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली. या सरावाला इस्रायलविरोधी शक्तीप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे.
13 जून रोजी इस्रायलने इराणी अणुप्रकल्प आणि लष्करी तळांवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. यात इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांसह तब्बल 1,000 हून अधिक लोक ठार झाले. प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले चढवले, ज्यात डझनभर इस्रायली सैनिक आणि नागरिक मारले गेले. या संघर्षानंतर आंतरराष्ट्रीय दबावामुळे 24 जून रोजी युद्धबंदी करण्यात आली. परंतु या युद्धाने मध्यपूर्वेतील भू-राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची केली आहेत.
मध्यपूर्वेतील शक्तिसंतुलनाचा विचार करता इराणने ‘प्रतिरोधाचा अक्ष’ (Axis of Resistance) नावाची आघाडी उभारली आहे. या आघाडीत इराणसोबत सीरिया, लेबनॉन, इराक, येमेन आणि पॅलेस्टाईनमधील विविध गट सामील आहेत. यामध्ये प्रामुख्याने हिजबुल्लाह, हुथी बंडखोर आणि हमास यांचा समावेश आहे. या आघाडीचा मुख्य उद्देश पाश्चात्य देशांचा व इस्रायलचा दबाव कमी करणे, तसेच इराणची ताकद मध्यपूर्वेत अधिक बळकट करणे हा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायलच्या हल्ल्यांनी मध्यपूर्वेत नवे संकटवर्तुळ! गाझा, लेबनॉन, सीरिया नंतर आता ‘या’ चौथ्या देशावर प्राणघातक हल्ला
इराणच्या या हालचालींमुळे इस्रायलसह अमेरिकेलाही अधिक सतर्क रहावे लागेल. लष्करी तज्ज्ञांच्या मते, इराणने आपल्या शस्त्रास्त्र उत्पादनाची पायाभूत रचना विविध देशांत उभारली असल्याने भविष्यात युद्धाचा धोका आणखी वाढू शकतो. इस्रायलमधील आंदोलनं दर्शवतात की, सामान्य जनता युद्धापेक्षा शांततेला प्राधान्य देत आहे. मात्र, इराणच्या नव्या रणनीतींमुळे मध्यपूर्वेतील संघर्षाचा पट आणखी उग्र होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.