स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कधीच सुरु झाली आहे मात्र हे अभियान फक्त कागदावरच दिसून येतं. सध्याची परिस्थिती पाहता भारतदेश हा राहणाऱ्या नागरिकांचा नव्हे तर वाढत जाणाऱ्या कचऱ्याचं आणि घाणीचं साम्राज्य होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला आहे.
शशांक कायमच कोणत्या ना कोणत्या समस्यांचा व्हिडीओ करुन सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. कधी वाहतूक कोंडीमुळ होणारा त्रास तर कधी कचऱ्यामुळे वाढत जाणारी दुर्गंधी यावर तो कायमच व्यक्त होत असतो. शशांकने काही तासांपुर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे यात त्याने असं म्हटलं आहे की, मला माहितेय मी हे असे व्हिडीओ बनवतो त्यामुळे मला माझे कलिग, नातेवाईक आणि ओळखीचे खूप जण हसतात. रोज रोज या कचऱ्याचे व्हिडीओ करुन काय होणार आहे, कोणाला काय फरक पडणार आहे असं अनेक जणांना वाटतं, मला वेड्यात देखील काढलं जातं.मात्र मी बोलायचा थांबणार नाही.
शशांकने 1 ऑगस्टपासून ते 15 ऑगस्टपर्यंत अशा 15 दिवसांचे व्हिडीओ शुट करुन पोस्ट केले आहेत. ज्यात ठाण्यातील पोखरण परिसरात दिवसेंदिवस घाणाीचं साम्राज्य वाढताना दिसत आहे. यासगळ्या अस्वच्छतेवर शशांक पुन्हा एकदा भडकला आहे. देशाला फक्त गुमालगिरीतून स्वातंत्र्य मिळालं आहे. आता खरी गरच आणि ते घाणीपासून स्वतंत्र होण्याची तरच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्याला अर्थ आहे, असं शशांकने सांगितलं आहे.
व्हिडीओ पोस्ट करत शशांकने कॅप्शनमध्ये लिहिलं की, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारत आणखी एका वर्षानी मोठा झाला!
म्हणजे हा भारताचा वाढदिवस!
येणारं पुढील वर्ष भारतासाठी स्वच्छ, आणि आनंददायी जावो हीच प्रार्थना. माझ्या अशा छोट्या छोट्या प्रयत्नातून भारत स्वच्छ होईल का ? मला माहीत नाही. पण निदान माझा परिसर तरी स्वच्छ ठेवण्याचा मी प्रयत्न करेन.
फक्त एकदा हे सगळ्यांनी ठरवलं की झालाच भारत स्वच्छ आता कृपा करून, हा पक्ष तो पक्ष या गप्पा मारू नका.. त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. जे सत्तेत आहेत आणि जे आधी होते, दोन्ही वेळेला अस्वच्छता ही भारताची ओळख राहिलेलीच आहे. सामान्य नागरिकाला स्वच्छ परिसर मिळावा , शुद्ध हवा मिळावी, या काही अवाजवी अपेक्षा नाहीत भारत उत्तम प्रगती करतोय यात वाद नाही. ‘स्वच्छ भारत’ मोहीम सुद्धा कौतुकास्पद आहे पण होणाऱ्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावणं गरजेचं आहे,असं देखील शशांकने सांगितलं आहे.