गायिका वैशाली सामंत (Vaishali Samant) हिने इतकी वर्षे वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी गाऊन आपलं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. हिंदी, मराठी तसेच इतर कुठल्याही भाषांमध्ये वैशाली सामंत सहजतेने वावरलेली आहे. फक्त गायिकाच नव्हे तर संगीतकार, गीतकार असा तिचा प्रवास उंचावत गेला आहे. आता आणखी एक पाऊल पुढे म्हणजे निर्मिती क्षेत्रात तिने पदार्पण केलं आहे. ते निमित्त म्हणजे टी सिरीज (T Series) प्रस्तुत ‘सांग ना…!’‘टी सिरीज’ आणि वैशाली सामंत यांनी मिळून केलेलं हे पहिलं इंडिपेंडंट साँग आहे. या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात अभिजित खांडकेकर (Abhijeet Khandkekar) आणि सुखदा खांडकेकर (Sukhada Khandkekar) जे दोघंही उत्कृष्ट कलाकार आहेत आणि खऱ्या आयुष्यात नवरा बायको आहेत ते या गाण्याच्या निमित्तानं पडद्यावर आपल्याला पहिल्या प्रथमच एकत्र दिसणार आहेत.
‘सांग ना…’ या गाण्यात छोटीशी उत्कंठावर्धक कथा आहे. कथा जरी मॅाडर्न ऑफिसमधली असली, तरी त्यातील शब्दरचना रांगड्या भाषेतील आहे. त्यामुळं हे गाणं रसिकांना वेगळाच अनुभव देणारं ठरेल.
या गाण्याबद्दल वैशाली सामंत म्हणाल्या की, फिल्मी आणि नॉन फिल्मी अश्या दोन प्रकारचं संगीत असतं, जेव्हा तुम्ही नॉन फिल्मी म्हणजे आजच्या भाषेत म्हणायचं तर इंडिपेंडंट गाणं करता, तेव्हा ते गाणं कसं असावं याचे फ्रीडम आपल्याला असते. आणि ते गाणं चांगलं करण्याची जबाबदारीही आपलीच असते. माझ्यासाठी गाणं म्हणजे एक दागिना आहे. त्याची जडण घडण कशी असावी, तो दागिना सुंदर दिसण्यासाठी जशी नजाकत महत्वाची आहे तसेच गाण्याचे आहे. त्याचे शब्द, त्याची चाल, त्याचा ठेका आणि त्याच्यातील स्वर हे सगळे इंपॉर्टन्ट अस्पेक्ट्स आहेत. मी प्रत्येकवेळी हा प्रयत्न करते कि माझ्याकडून माझ्या श्रोत्यांसाठी काहीतरी वेगळा जॉनर, वेगळा दागिना मी सादर करू शकेन. यावेळी जेव्हा ‘सांग ना..’ मी ऐकलं तेव्हा असंच वाटलं की या प्रकारचं गाणं या आधी माझ्याकडून नाही झालंय. ‘सांग ना..’मध्ये शब्द, ठेका, आणि एक छान ट्रान्स असलेली चाल आहे आणि एका मुलीचा हट्ट आहे, स्वत:च्या प्रियकरासाठी ती गाताना कसे एक्स्प्रेशन आहेत, हे सगळं बघून मला असं वाटलं की हे मी गावं आणि मग ‘सांग ना’ या गाण्याची खऱ्या अर्थानं प्रोसेस सुरु झाली.
त्या पुढे म्हणाल्या, अश्विनने ज्या तऱ्हेने याचे शब्द लिहिलेत त्याच्या कॉन्ट्रास्ट याचा व्हिडिओ असावा असं लगेच मनात आलं. ‘टी-सिरीज’ला हे गाणं आवडलं आणि त्यांनी मलाच या गाण्याची निर्मिती करण्यास सांगितली. त्यामुळेच मी गायिका, संगीतकार थोडीशी गीतकार करता करता आज निर्माती झाले. ‘ऐका प्रॉडक्शन’ या नावाच एक म्युझिक प्रॉडक्शन लेबल सुरु केलं आहे. ही म्युझिक कंपनी नाहीये, फक्त म्युझिक प्रॉडक्शन लेबल आहे आत्तातरी.
[read_also content=”विमानाच्या आकाराच्या Asteroid 22 RQ ची पृथ्वीच्या दिशेने वाटचाल https://www.navarashtra.com/world/asteroid-22-rq-coming-towards-earth-nrsr-325456/”]
अभिजीत खांडकेकर म्हणाला की, सुखदा आणि मी फार कमी वेळा एकत्र आलो आहोत, पण म्युझिक अल्बमसाठी आम्हाला एकत्र आणण्याची किमया ‘सांग ना…’नं केली आहे. आम्हाला एकत्र पाहण्याची आमच्या चाहत्यांची इच्छा या निमित्तानं पूर्ण झाली आहे. वैशाली सामंत यांचा मी खूप मोठा फॅन आहे. माझ्या पहिल्या चित्रपटातील गाण्याला त्यांचा आवाज होता. लोकप्रियतेचे बरेच विक्रम आपल्या नावे करणाऱ्या गायिकेनं अल्बमसाठी विचारणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. भंडारेंनी हे गाणं खूप सुंदररित्या शब्दबद्ध केलं आहे.