(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरू झाला असून विनोद आणि एआयचा संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. सध्या सर्वत्र प्रदर्शित झालेला ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवत असतानाच आता त्यातील एक भन्नाट सरप्राईज चर्चेचा विषय ठरला आहे. मराठीतील पहिले एआय प्रमोशनल साँग म्हणून या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
मदनचा विनोदी अंदाज, चंदनची निरागसता, रतनचा ताठर स्वभाव आणि बबनचा खोडकरपणा आधीच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत. त्यातच एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या पात्रांना नव्या, गोंडस आणि कल्पनारम्य रूपात सादर करण्यात आले आहे. कुरळे ब्रदर्सचा साधेपणा आणि निरागसता एआयच्या सहाय्याने आणखी खुलून दिसते, ज्यामुळे प्रेक्षकांना हा प्रयोग विशेष आवडलेला दिसत आहे.
Don 3 Movie: रणवीर सिंग नंतर फरहान अख्तर स्वतः साकारणार‘डॉन’ची भूमिका? चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर
या गाण्याला गौरव चाटी आणि आदित्य बेडेकर यांचे जोशपूर्ण संगीत लाभले असून विक्रम हिरनाईक यांनी ते शब्दबद्ध केले आहे. गाण्याला दमदार आवाज अवधूत गुप्ते यांनी दिला आहे. ऐकायला जितके भन्नाट, तितकेच पाहायलाही हे गाणे तितकेच आकर्षक ठरत आहे. एआय तंत्रज्ञानामुळे प्रत्येक फ्रेम अधिक रंगतदार आणि वेगळी भासते आहे.
या संकल्पनेची मांडणी आणि सादरीकरणाची जबाबदारी ईओडी मीडियाच्या पुष्कर आणि रश्मी यांनी समर्थपणे पार पाडली आहे. सोशल मीडियावर या गाण्याचे क्लिप्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. रील्स, स्टेटस आणि कमेंट्समध्ये या गाण्याचीच चर्चा रंगली असून “मराठीत असा प्रयोग अभिमानास्पद आहे”, “एआयमधील कलाकार खूपच क्यूट दिसतात”, “गाणं पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतं” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत.
चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळत आहेत, तर संजय नार्वेकर पाहुणे कलाकार म्हणून झळकले आहेत. दिग्दर्शनाची धुरा अंकुश चौधरी यांनी सांभाळली आहे. विनोदाचा ठसका आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यामुळे ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता मराठी सिनेसृष्टीतील नव्या प्रयोगांचा मार्ग मोकळा करत आहे. एआय प्रमोशनल साँगमुळे या चित्रपटाची क्रेझ आणखी वाढली असून, मराठी चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञानाचा नवा ट्रेंड सुरू झाल्याची जाणीव या निमित्ताने दिसून येत आहे.






