
( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भारतीय चित्रपटसृष्टीचे दिग्गज दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’सारख्या जागतिक स्तरावर गाजलेल्या चित्रपटांद्वारे भारतीय सिनेमाला नवी ओळख मिळवून देणाऱ्या राजामौली यांचा आता फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे विशेष सन्मान करण्यात आला आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट संस्थांपैकी एक असलेल्या सिनेमाथेक फ्राँसेझ (Cinémathèque Française) या संस्थेत त्यांना कायमस्वरूपी स्थान देण्यात आले आहे.
महान चित्रपट अभ्यासक हेन्री लँग्लुआ यांनी स्थापन केलेली ही संस्था जागतिक चित्रपट वारशाचे जतन आणि गौरव करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या संस्थेत स्थान मिळणे हा केवळ एस.एस. राजामौली यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
या कार्यक्रमात ऑस्कर विजेते ग्रीक-फ्रेंच दिग्दर्शक कोस्टा-गावरास यांनीही राजामौली यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे, मास्टरक्लासपूर्वी त्यांनी जवळपास आठ तास राजामौली यांचे चित्रपट पाहिले आणि संपूर्ण सत्रात उपस्थित राहून त्यांच्या दिग्दर्शनशैलीचे कौतुक केले. भारतीय सिनेमाच्या जागतिक प्रभावाचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे.
या सन्मानानंतर भावना व्यक्त करताना एस.एस. राजामौली म्हणाले, “पॅरिसमध्ये माझ्या चित्रपटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले, हाच माझ्यासाठी मोठा सन्मान होता. मात्र त्यानंतर मिळालेल्या या अनपेक्षित गौरवाने मी भारावून गेलो आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट संस्थांपैकी एका संस्थेच्या भिंतीवर कायमस्वरूपी स्थान मिळणे ही आयुष्यातील अविस्मरणीय गोष्ट आहे.”
राजामौली यांनी या सन्मानासाठी कोस्टा-गावरास आणि संपूर्ण सिनेमाथेक फ्राँसेझ परिवाराचे आभार मानत भारतीय सिनेमाला दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान, निर्माते हर्षा चुंदूरू यांनीही हा गौरव शेअर करत लिहिले की, मार्टिन स्कॉर्सेसी, जेम्स कॅमेरॉन आणि डेव्हिड फिंचर यांसारख्या जागतिक दिग्गजांनंतर एस.एस. राजामौली यांना मिळालेला हा सन्मान भारतीय सिनेमासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या मते, असे सन्मान केवळ बॉक्स ऑफिसवरील यशामुळे मिळत नाहीत, तर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि जागतिक चित्रपटसृष्टीवर कायमस्वरूपी प्रभाव टाकणाऱ्या कलाकृतींमुळे मिळतात.
दरम्यान, एस.एस. राजामौली सध्या त्यांच्या आगामी महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहेत. महेश बाबू, प्रियंका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या बिग-बजेट चित्रपटाकडून चाहत्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या असून, हा चित्रपट भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर आणखी एका उंचीवर नेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Having me here in Paris and screening my films is itself an honour for me. But a sweet surprise I never saw coming. It is a feeling I cannot fully put into words. To have a permanent place in the halls of one of the world’s most legendary film institutions, named after the great… pic.twitter.com/XYrNWfm4BU — rajamouli ss (@ssrajamouli) June 28, 2026