(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
रणवीर सिंग अभिनीत आणि आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर दहाव्या दिवशीच ८०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत असला, तरी त्यावर टीकाही होत आहे. अलीकडे ‘सैयारा’ फेम अभिनेत्री अनीत पड्डा हिची बहिण रीत पड्डाने ‘धुरंधर 2’ला ‘प्रोपगंडा फिल्म’ असे म्हटले आहे. यानंतर त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. या ट्रोलिंगला कंटाळून रीत पड्डा यांनी आपले इन्स्टाग्राम अकाउंटही डिलीट केले आहे.
काही दिवसांपूर्वी रीत पड्डा यांनी ‘धुरंधर 2’बाबत आपले मत सोशल मीडियावर व्यक्त केले होते. एका युजरला उत्तर देताना तिने या चित्रपटाला ‘प्रोपगंडा फिल्म’ असे संबोधले होते. रीतच्या मते, ‘धुरंधर 2’ ही सरकार समर्थक कथा दाखवणारी फिल्म असून त्यात राजकीय भाषणांचा वापर करण्यात आला आहे. तसेच नोटबंदी सारख्या गोष्टींना योग्य ठरवण्याचा प्रयत्न केला असल्याचे तिने म्हटले आहे. “यालाच प्रोपगंडा म्हणतात, पण कदाचित तुमची त्याची व्याख्या वेगळी असेल,” असेही तिने नमूद केले आहे.
याशिवाय, रीत यांनी द काश्मीर फाइल्स आणि द केरळ स्टोरी सारख्या चित्रपटांवरही टीका केली होती. या वक्तव्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. सध्या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट सर्च केल्यावर दिसत नसल्याचे समोर आले आहे.
रीत पड्डा काय करते?
अभिनेत्री अनीत पड्डा बॉलीवूडमध्ये सक्रिय असताना, तिची बहीण रीत पड्डा पॅरिसमध्ये मार्केटिंग एक्सपर्ट म्हणून काम करते. तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्या मानवाधिकार आणि नागरी हक्क कार्यकर्त्या देखील आहे. सध्या रीत पड्डा सोशल मीडियावर चांगल्याच ट्रेंड होत असून अनेक नेटकऱ्यांकडून तिला समर्थनही मिळत आहे.
‘धुरंधर 2’चे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती आदित्य धर याने केली आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल असून, त्या चित्रपटाने जगभरात 1300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. ‘धुरंधर’ फ्रँचायझीचे एकूण कलेक्शन आता 2000 कोटींच्या जवळ पोहोचले आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी, गौरव गेरा, दानिश पंडोर आणि मानव गोहिल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.






