हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ व्हिडिओ प्रकरणी राजीनाम्याची मागणी केली जात आहे (फोटो - सोशल मीडिया)
Hingoli News : सावनेर : हिंगोलीमधील जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निधी वाटपाबाबत नवा वाद उफाळून आला असून “जो करेल नाशिकची वारी त्यालाच मंत्री” अशी चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यकाळात झालेल्या ऑनलाईन बैठका आणि त्यानंतर झालेल्या निधी वाटपाच्या प्रक्रियेबाबत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप होत आहे. (Hingoli News)
मिळालेल्या माहितीनुसार, झिरवाळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बहुतांश बैठका प्रत्यक्ष हिंगोलीत न घेता ऑनलाईनच घेतल्या. या बैठकीनंतर नाशिक येथे प्रत्यक्ष भेट देणाऱ्या लोकप्रतिनिधी किंवा संबंधितांच्या कामांना मंजुरी मिळाल्याची चर्चा असून इतर प्रस्ताव मात्र प्रलंबित ठेवण्यात आल्याची नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अनेकांची “नाशिक वारी” वाढल्याचे बोलले जात आहे. पालकमंत्री म्हणून नियुक्तीनंतर झिरवाळ पहिल्यापासूनच वादात राहिले आहेत.
वसमत येथील पहिल्या दौऱ्यात त्यांनी हिंगोलीला मागास जिल्हा म्हणत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील कार्यक्रमांनाही त्यांनी अनुपस्थिती दर्शविल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. नंतर आपल्या वक्तव्यावर त्यांनी स्पष्टीकरण देत विकासाच्या दृष्टीने ते विधान केल्याचे सांगितले असले तरी त्यांच्या कार्यपद्धतीबाबतचा रोष कमी झालेला नाही. विशेषतः डीपीडीसी निधी मंजुरी प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप होत असून काही कंत्राटदारही प्रस्ताव घेऊन थेट नाशिकला जात असल्याची चर्चा आहे.
हे देखील वाचा : “अशोक खरातांच्या पाठीशी सरकार…”, संजय राऊतांच्या आरोपांनंतर राजकारणात खळबळ
दरम्यान, त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली पण अद्याप निविदा प्रक्रिया न झालेली कामे तात्काळ रद्द करावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या कामांची चौकशी झाल्यास ऑनलाईन बैठकीमागील वास्तव समोर येईल, असेही बोलले जात आहे. एकूणच, डीपीडीसी निधी वाटपाच्या पद्धतीवरून पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात जिल्ह्यात नाराजीचा सूर वाढत असून नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकींचे गूढ अजूनही कायम असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हिंगोली जिल्ह्याचे झेंडामंत्री म्हणून ओळख निर्माण झालेल्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथीत व्हिडिओ प्रकरणामुळे हिंगोलीचे नाव धुळीला मिळाले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून ‘आर्थिक हिताची’ कामे करणाऱ्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा शासनाने राजीनामा घ्यावा अशी मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
हिंगोलीच्या पालकमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा
या संदर्भात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी सांगितले की, हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून झिरवाळ यांची निवड झाल्यानंतर त्यांनी हिंगोलीच्या पहिल्याच दौऱ्यात हिंगोली गरिब जिल्हा असल्याचे सांगत जिल्हावासियांच्या जखमेवर मीठ चोळले. पहिल्याच भेटीतून ते जिल्हयात काय विकास करणार हे स्पष्ट झाले होते. झेंडा मंत्री झिरवळांनी हिंगोली जिल्ह्यात कधीही शेतकऱ्यांच्य प्रश्नावर आवाज उठविला नाही.
हे देखील वाचा : राजकीय पटावर धोंडगे बंधूंची दमदार एंट्री; नांदेडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन
हिंगोली जिल्हयात मागील दोन ते तीन वर्षापासून शेतकरी अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतरही पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्य बांधावर जाऊन भेटी दिल्या नाहीत. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या
पिकविम्याच्या प्रश्नावर त्यांनी कधीही विमा कंपनीला धारेवर धरले नाही. विमा कंपनीने केवळ २५ टक्के अग्रीम रक्कम दिल्यानंतर पुढील रक्कम शेतकऱ्यांना दिलीच नाही. त्याकडेही पालकमंत्री झिरवाळ यांनी लक्ष दिले नाही. एकीकडे लिगो प्रकल्पामुळे हिंगोलीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले असून दुसरीकडे पालकमंत्री झिहरवाळांच्या कथित व्हिडीओने हिंगोलीचे नाव मात्र पार धुळीला मिळाले आहे. त्यामुळे केवळ आर्थिक हिताची कामे जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेली कामे रद्द करावीत तसेच पालकमंत्री झिरवाळ यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी दिला आहे.






