(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आमिर खान प्रोडक्शन्सच्या आगामी ‘एक दिन’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. एक गोड, हळवी आणि मनाला भिडणारी प्रेमकथा सांगणारा हा चित्रपट ट्रेलर आणि आधी रिलीज झालेल्या सुरेल गाण्यांमुळे आधीच चर्चेत आला आहे. आता या चित्रपटातील ‘कोनिचिवा’ हे नवे गाणे रिलीज झाले असून, त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘कोनिचिवा’ हे एक सुंदर ट्रॅव्हल साँग असून, जपानच्या निसर्गरम्य लोकेशन्समध्ये चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यातील दृश्ये अत्यंत आकर्षक असून, त्यात जपानच्या सौंदर्याची अप्रतिम झलक पाहायला मिळते. यासोबतच साई पल्लवी आणि जुनैद खान यांची गोड आणि नैसर्गिक केमिस्ट्रीही या गाण्याचा खास आकर्षण ठरत आहे. त्यांच्या सहज अभिनयामुळे हे गाणे अधिकच मनाला भिडणारे झाले आहे.
साद लामजारेड आणि अंशुल गर्ग पुन्हा एकत्र, शहनाज गिलच्या ‘बेज़ाफ़’साठी चाहत्यांची उत्सुकता
मेकर्सनी सोशल मीडियावर हे गाणे शेअर करत, “कोनिचिवा म्हणता म्हणता… ट्रिप बनली एक आठवण!” असे कॅप्शन देऊन पोस्ट शेअर केली आहे. या ओळींमधूनच गाण्याचा हलका-फुलका आणि भावनिक अंदाज पाहायला मिळत आहे. #Konichiwa आणि #EkDin या हॅशटॅग्ससह हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. तसेच या गाण्यामधील साई पल्लवी-जुनैद खान केमिस्ट्री चाहत्यांना देखील आवडली आहे.
या चित्रपटाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे आमिर खान आणि मन्सूर खान यांची जोडी पुन्हा एकत्र झळकणार आहे. ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘अकेले हम अकेले तुम’ आणि ‘जाने तू… या जाने ना’ यांसारखे अविस्मरणीय चित्रपट देणारी ही जोडी अनेक वर्षांनंतर ‘एक दिन’च्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाद्वारे ते पुन्हा एकदा रोमँटिक जॉनरमध्ये परतत आहेत.
‘एक दिन’मध्ये साई पल्लवी-जुनैद खान मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्या फ्रेश जोडीमुळे चित्रपटाला एक वेगळेपण लाभले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केले असून, निर्मिती आमिर खान, मन्सूर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी केली आहे. एकूणच, सुंदर लोकेशन्स, हळवी प्रेमकथा, गोड संगीत आणि दमदार स्टारकास्ट यामुळे ‘एक दिन’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक खास अनुभव ठरणार आहे. ‘कोनिचिवा’ गाण्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून, आता 1 मे 2026 रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर कोणती जादू दाखवतो, याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.






