(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहिलेलं गाजलेलं नाटक ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे पुन्हा एकदा नव्या उत्साहात रंगमंचावर परतणार आहे. काही काळाच्या विश्रांतीनंतर हे लोकप्रिय नाटक आता नव्या रूपात सादर होणार असून, येत्या ११ एप्रिल रोजी रवींद्र नाट्यमंदिर येथे त्याचा खास प्रयोग रंगणार आहे. जो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता आता आणखी वाढली आहे.
अमेय विनोद खोपकर प्रस्तुत आणि एव्हीके पिक्चर्स तसेच सीजी ग्रुप यांच्या निर्मितीतून साकारलेलं हे नाटक दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या नेटक्या दिग्दर्शनामुळे आणि लेखक श्रीनिवास भणगे यांच्या खुसखुशीत लेखणीतून प्रेक्षकांना खळखळून हसवतं, तसेच नातेसंबंधांवर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करणारं हे नाटक आहे. संगीतकार अजित परब यांच्या सुरांनी नाटकाला अधिक रंगत आणली आहे.
निर्मिती सावंत यांच्या ‘भागूबाई’चा मजेशीर मोशन पोस्टर रिलीज; ग्रामीण गप्पा आणि रहस्याचा अनोखा संगम
या नाटकात प्रियदर्शन जाधव, विक्रांत कोळपे, सुकन्या काळण, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, मयुरा रानडे आणि विशाखा सुभेदार यांसारख्या दमदार कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे. ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे नाटक कुटुंबातील छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून उलगडणारे नातेसंबंध, त्यातील गंमती-जंमती, गैरसमज आणि आपुलकी यांचा हलकाफुलका वेध घेतं. त्यामुळे हे नाटक प्रेक्षकांना केवळ हसवत नाही, तर त्यांना स्वतःच्या आयुष्याशी जोडून ठेवतं. पूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाचं असल्यामुळे हे नाटक सगळ्यांनी एकत्र बसून पाहण्यासारखं आहे.
दिग्दर्शक विजय केंकरे सांगतात की, “रंगभूमी ही जिवंत माध्यम आहे. प्रत्येक प्रयोग प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे नव्याने घडतो. हे नाटक पुन्हा सादर करताना आम्ही त्यात आजच्या काळाची झलक आणि अधिक परिपक्वता आणण्याचा प्रयत्न केला आहे.” तसेच निर्माते अमेय विनोद खोपकर यांच्या मते, “चांगल्या आशयाला वेळेची मर्यादा नसते. हे नाटक आधी गाजलं कारण त्यात प्रामाणिकपणा होता आणि आजही तो तितकाच जिवंत आहे.” तर निर्माते दिनेश खंडागळे यांनीही या दर्जेदार नाटकाचा भाग असल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
चक्क चक्कीत दळला मृतदेह! तुंरुगात झालेला खून अन् त्या मागचा थरार; ‘या’ सिनेमामुळे Netflix चर्चेत
एकूणच, हास्य आणि भावनांचा सुंदर मिलाफ असलेलं ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झालं आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत दर्जेदार आणि हलकंफुलकं मनोरंजन अनुभवण्यासाठी हे नाटक एक उत्तम पर्याय ठरणार आहे.






