लाहोर : गीतकार जावेद अख्तर(Javed Akhtar) कायम त्यांच्या वेगवेगळ्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आपल्या मतांवर ते कायम ठाम असतात. आता पाकिस्तानात केलेल्या एका वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. जवळपास 5 वर्षानंतर जावेद अख्तर हे लाहोरमध्ये (Lahore) आयोजित करण्यात आलेल्या फैज महोत्सवात सामील झाले. धर्मनिरपेक्ष विचार स्पष्टपणे मांडणारे अख्तर हे भारतातील गोष्टींवर परखडपणे टीका करतील अशी आशा माध्यमांना होती. मात्र जावेद अख्तर यांनी पाकिस्तानलाच सुनावलं. ते पाहून पाकिस्तानी माध्यमकर्मींचा अपेक्षाभंग झाला.
नुसरत फतेह अली खान, मेंहदी हसन, फैज अहमद फैज या सारख्या पाकिस्तानी कलाकारांचे भारताने स्वागत केले. मात्र पाकिस्तानमध्ये कधीही लता मंगेशकर यांचा कार्यक्रम झाला नाही, असे अख्तर यांनी या कार्यक्रमात म्हटले.
मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याबाबत जावेद अख्तर (Javed Akhtar On Mumbai Attack) म्हणाले की, हल्ली वातावरण फार तापलेलं असून ते निवळण्याची गरज आहे. आम्ही मुंबईचे लोक आहोत आणि आम्ही हा हल्ला कसा झाला ते पाहिले आहे. हे दहशतवादी नॉर्वेतून आले नव्हते किंवा इजिप्तमधूनही आले नव्हते. हल्ल्याचे गुन्हेगार पाकिस्तानी होते, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करण्याची अपेक्षा भारतीयांकडून केली जाऊ शकत नाही. ही मंडळी आजही तुमच्या देशात फिरत आहेत. यामुळे जर भारतीयांच्या मनात य हल्ल्याबाबत काही तक्रार असेल तर याबद्दल तुम्हाला वाईट वाटण्याचे काही कारण नाही. कंगनानेही जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘घर मे घुस के मारा’, असं तिने म्हटलं आहे.
Jab main Javed saab ki poetry sunti hoon toh lagta tha yeh kaise Maa Swarsati ji ki in pe itni kripa hai, lekin dekho kuch toh sachchai hoti hai insaan mein tabhi toh khudai hoti hai unke saath mein … Jai Hind @Javedakhtarjadu saab… ??
Ghar mein ghuss ke maara .. ha ha ???? https://t.co/1di4xtt6QF— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 21, 2023
जावेद अख्तर यांनी या कार्यक्रमात म्हटले की दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक जागरुकतेची कमतरता आहे. दोन्ही देशांतील लोकांना एकमेकांच्या संस्कृतीबाबत माहिती नसतं. फार कमी लोकांना माहिती आहे की अमृतसर आणि लाहोरमधील अंतर हे फक्त 30 किलोमीटर आहे. असं असलं तरी तुम्ही आमच्याबाबत फार जाणत नाही आणि आम्ही तुमच्याबाबत फार जाणत नाही असं ते म्हणाले. ज्ञानाचा अभाव हा दोन्ही देशांना हानी पोहचवत असल्याचं ते म्हणाले. दोन देशांत सांस्कृतिक आदानप्रदान किंवा विद्यार्थांचे आदानप्रदान होत नाही, हा मुद्दाही त्यांनी मांडला.