जान्हवी किल्लेकर-अलिबाग : महाराष्ट्राची किलर गर्ल, रायगडची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील गायकवाड कुटुंबातील कन्या असलेल्या आणि सध्या पेण येथे स्थायिक झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (गायकवाड) यांनी कलर्स मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध टिव्ही रिऍलिटी शो बिग बॉस सिझन ५ च्या स्पर्धेत सहभागी होण्याचा बहुमान मिळवला होता. त्याचबरोबर ती त्या शोची फायनलिस्ट देखील होती. याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. स्पर्धेनंतर नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तिने कुटुंबासह आपल्या मूळगावी म्हणजेच अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे गायकवाड कुटुंबाच्या कुलदेवतेचे दर्शन घेण्यासाठी आली होती. यावेळी तिला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.
जान्हवी किल्लेकर (गायकवाड) यांचे आजोबा पांडुरंग गायकवाड हे मूळचे अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील रहिवासी आहेत, ते नोकरीकामानिमित्त ठाणे येथे स्थायिक झाले होते. तर वडील हे पेण येथे कामानिमित्त स्थायिक झाले. जान्हवी किल्लेकर (गायकवाड) हिचे सासर हे मुंबई येथील असून ती मुंबई येथेच स्थायिक झाली आहे. तिचे कुटुंब हे प्रत्येकवेळी नाते जपत विविध कार्यक्रमानिमित्ताने तसेच कुलदेवतांच्या दर्शनासाठी चोंढीमध्ये येत असतात. जान्हवी हिने अल्पावधीत विविध सिने क्षेत्रात तिने सहभाग घेत नावलौकिक मिळविले आहे. नुकत्याच झालेल्या बिगबॉस सिझन ५ च्या स्पर्धेत तिने काही प्रमाणात यश मिळवले आहे.
रविवारी स्पर्धा संपल्यानंतर तिने नवरात्रोत्सव निमित्ताने आपल्या माहेर असलेल्या अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे कुलदेवतांच्या दर्शनासाठी आपले काका ज्येष्ठ समाजसेवक सुधीर (बाळू) गायकवाड आणि किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या निवासस्थानी सहकुटुंब जाऊन देवीची ओटीभरण करत दर्शन घेतले. यावेळी गायकवाड कुटुंबासोबत बिगबॉसच्या स्पर्धेच्या बाबतीत आणि इतर कौटुंबिक विषयावर अनौपचारिक गप्पा मारल्या. याचदरम्यान चोंढी येथील नवयुवक मंडळातर्फे नवरात्रोत्सव निमित्ताने विराजमान देवीचे दर्शन घेतले. मंडळाच्या स्थानापन्न देवीच्या दर्शनासाठी आली तेव्हा त्यांच्या महिला आणि पुरुष चाहत्यांनी सेल्फी, फोटो घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
यावेळी चोंढी येथील काका सुधीर गायकवाड, भाऊ सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड व सासवणे ग्रामपंचायत सदस्या संजना पाटील, संदेश पाटील, चोंढी – बामणसुरे पोलीस पाटील प्रिती गायकवाड यांच्यासह गायकवाड कुटुंबातील इतर सर्व सदस्य पंचक्रोशीतील इतर सर्व गटातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांच्या वतीने जान्हवी किल्लेकर(गायकवाड) हिचा पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी जान्हवी सोबत तिचे पती, आई, मुलगा, मुलगी, बहीण, दोन काकी उपस्थित होते.






