मुंबई : व्हॅलेंटाइन डेला फिरायला जाणं,एकमेकांना गिफ्ट देणं हे तर प्रत्येक जण करतं. पण अभिजीत आणि सुखदा खांडकेकर यांचं सेलिब्रेशन नेमकं कसं असतं? हे जाणून घेण्यासाठी ‘नवराष्ट्र’च्या टीमने सुखदा खांडकेकरशी साधलेला हा संवाद.
1 फेब्रुवारी 2022 मध्ये माझ्या आणि अभिजीतच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली. वर्षे भरात अनेक प्रसंग असे येतात, जेव्हा आम्ही डिनरला जातो, एकमेकांना गिफ्ट देतो. हवे त्या प्रसंगाला एकमेकांसाठी हजर असतो. त्यामुळे वर्षभरातून फक्त एकच दिवस नाही तर दर महिन्यातून एकदा आमचं ‘व्हॅलेंटाइन डे’चं सेलिब्रेशन सुरु असतं.
पहिल्या व्हॅलेंटाइनच्या आठवणी
पहिल्या व्हॅलेंटाइनला अभीने मला हेअर ड्रायर गिफ्ट दिलं होतं. पूर्वी माझे खूप दाट आणि लांब केस होते. त्यामुळे केस धुतले की, मला पटकन सर्दी व्हायची आणि तेव्हा माझ्याकडे हेअर ड्रायर नव्हता. त्यामुळे अभीने मला हेअर ड्रायर गिफ्ट दिलं होतं. एखाद्याला फॅन्सी गिफ्ट देण्यापेक्षा त्याला ज्या गोष्टीची गरज आहे ते गिफ्ट म्हणून देणं हे अभी नेहमीच करत आला आहे आणि त्याच्यातली ही बाब मला खूपच भावते.
अभी आणि माझी लव्हस्टोरी
अभिजीत खांडकेकरची ‘माझीया प्रियाला प्रीत कळेना’ ही मालिका सुरु होत होती. तेव्हा मी त्याला फेसबुकवर पोस्ट टाकली की, तुझ्या मालिकेची जाहिरात पाहून खूप अभिमान वाटला, ‘ऑल दि बेस्ट’. त्यावर त्याचा छान रिप्लाय आला आणि त्यानंतर आमची मैत्री झाली. अनेक दिवस मेसेजमधून गप्पा झाल्या. त्यानंतर आम्ही भेटलो. आम्ही खूप घट्ट मित्र झालो. अभी आणि माझी आई मिळून माझ्यासाठी स्थळ शोधत होते. तेव्हा अभी एका वेगळ्या रिलेशनशीपमध्ये होता. मी तेव्हा अभीला त्या रिलेशनशीपसाठी मैत्रिण म्हणून त्याला सल्ला द्यायची. पण अभीचं ते नातं फार काही पुढे जाऊ शकलं नाही. दुसरीकडे माझे घरचे माझ्यासाठी स्थळ शोधत होते आणि दुस-यादिवशी मुलाकडचे मला पाहायला येणार. त्याच्या आदल्या रात्री अभीने मला लग्नासाठी मागणी घातली. तेव्हा मी निशब्द झाली होती. आईला सांगितलं तर, आई लगेच तयार झाली होती. कारण आईला अभी आधीपासूनच आवडायचा. त्यानंतर आठदिवसांनी अभी मला भेटायला आला. तेव्हा मी त्याला म्हटलं की, मैत्रिण म्हणून कदाचित मी वेगळी असू शकेल, बायको म्हणून वेगळी असेल, त्यावर तो म्हणाला की, माझा निर्णय झाला आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि मग मीही पूर्ण विचारानंतर लग्नाला होकार दिला. आमच्या दोघांच्या नात्यात एक सहजता आहे. त्यामुळेच नऊ वर्षे आमची लव्हस्टोरी सुरुच आहे.
प्रेम म्हणजे
स्वत: मध्ये असलेली सगळी माया आणि ताकद लावून त्या माणसासोबत उभं राहणं म्हणजे प्रेम. गिफ्ट देणं, डिनरला जाणं, किती मोठ्या घरात राहता? कुठली गाडी आहे? हे सगळं भौतिकसुख आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे एखादी चांगली-वाईट गोष्ट झाल्यानंतर मला आधी जाऊन त्या व्यक्तीला हे सांगायचं आहे आणि समोरच्याकडून ऐकणं की, मी आहे, हे प्रेम आहे.