"प्रवास सोप्पा नव्हता, काही कलाकार सोडून गेले..." अपूर्वाचा रोख कोणाकडे? शेवटच्या दिवसाच्या शूटिंगनंतर केली पोस्ट
जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या दिवसाचं शुटिंग पार पडलं. शुटिंग पार पडल्यानंतर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने शुटिंगच्या आठवणी आणि सेटवरचे फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“तू आज असतीस तर…”, क्षिती जोगने शेअर केली आजीसाठी खास पोस्ट; म्हणाली…
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमध्ये अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने सावनी नावाचं खलनायक पात्र साकारले आहे. अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट सध्या कमालीची चर्चेत आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अपूर्वाने लिहिले की, ” काल माझं (३० जून) ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचं शेवटचं शूटिंग पूर्ण झालं. खरंतर, कसं व्यक्त होऊ हे कळत नाहीये… कारण, माझ्या मनात आता असंख्य भावना दाटून आल्या आहेत. जवळजवळ दोन वर्षांचा हा प्रवास होता. अनेक आव्हानं, नव्या गोष्टी शिकण्याची संधी आणि आयुष्यात आलेल्या सुंदर अनुभवांनी परिपूर्ण असा हा प्रवास होता.”
“शेवंताची भूमिका ते सावनी… हा प्रवास एक अभिनेत्री म्हणून देखील खूप काही शिकवून गेला. हा २ वर्षांचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. आम्ही सुद्धा कठीण काळ अनुभवला आहे. पात्र बदलली, काही कलाकार मध्येच सोडून केले, सतत होणारे बदल या सगळ्या परिस्थितीत आम्ही खचलो नाही. ती आमची एकप्रकारे परीक्षाच होती. पण, काहीही झालं तरी, काम करतानाचा उत्साह, धमाल, मजा या सगळ्या गोष्टींमध्ये कोणतीच कमी भासणार नाही याची आम्ही काळजी घेतली. आपल्या कामाप्रती असलेली कमिटमेंट सर्वात महत्त्वाची असते. एक कलाकार म्हणून आपल्या संपूर्ण टीमच्या साथीने उभं राहणं खूप महत्त्वाचं असतं.”
‘एक तिची गोष्ट’ नाटकाचा शानदार प्रिमियर, नाट्यप्रेमींकडून कौतुक
“मी जाणीवपूर्वक सावनीची भूमिका स्वीकारली होती कारण, मला नकारात्मक पात्र साकारण्याचा अनुभव घ्यायचा होता जेणेकरून माझ्या कामात नवीन रंगछटा जोडता येतील, स्वतःला नवीन आव्हानं देता येतील. सावनीचा लूक, तिचे दागिने, तिचे संवाद आणि तिची देहबोली मी सगळं काही आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि या पात्राला पडद्यावर जिवंत केलं. सावनीला या पात्राला टीकेचा सामना सुद्धा करावा लागला कारण, नकारात्मक पात्रावर जेव्हा टीका होते, तेव्हाच तुम्हाला तुमच्या कामाची पोचपावती मिळते. या पात्रासाठी मला ‘सर्वोत्कृष्ट खलनायिका’, ‘द मोस्ट ग्लॅमरस फेस ऑफ द इयर २०२४’ असे पुरस्कार देखील मिळाले.”
” तुम्हा सर्वांचं प्रेम हे मला मिळालेलं सर्वात मोठं बक्षीस होतं. मी आभार मानू इच्छिते, ‘शशी-सुमीत प्रोडक्शन’ आणि ‘स्टार प्रवाह’ची आमची संपूर्ण टीम, आमच्या मालिकेची क्रिएटिव्ह टीम, लेखक, माझे सहकलाकार, माझ्यावर विश्वास ठेवणारे, माझ्या पाठिशी उभे राहणारे… आणि सावनीला घडवण्यास मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छिते. या मालिकेचा निरोप घेणं हे सोपं नाहीये. पण, म्हणतात ना… काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी तुम्हाला आधीचं काहीतरी संपवावं लागतं. तसंच काहीसं झालंय… मी लवकरच एका नवीन पात्रासह, एका नवीन कथेसह तुम्हा सर्वांच्या भेटीला येईल… सावनी तुमचा निरोप घेतेय…”