नवरात्र विशेष, सातवी माळ, आजचा रंग केशरी
केशरी हा रंग दैवी शक्तींचे प्रतिनिधित्व करतो. यामधून आशा व्यक्त होते. केशरी रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होऊन नकारात्मकतेचा नाश होतो. या रंगाच्या वापराने नैराश्य दूर होते. आज या केशरी रंगाची महती जाणून घेऊ.
केशरी रंग सुर्याशी निगडीत आहे. अंधार नाहीसा करणाऱ्या तेजाचा हा रंग. एखाद्या गोष्टीला आपण शारीरिक प्रतिसाद देतो. एखाद्या गोष्टीवर बुद्धीच्या बळावर मात करतो. पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण ‘गट फिलिंग’ने करतो. कधी कधी तिथे आपले तर्कशास्त्र, भावना बाजूला ठेवून काम करावे लागते. भगवा रंग हा आपल्या या ‘आतून’ येणाऱ्या आवाजाला खतपाणी घालतो.
लाल आणि पिवळ्या रंगाच्या संयोगाने बनणारा केशरी शक्ती, उत्साह आणि आरोग्य यांच्याशी संबंधित आहे. अतिशय पवित्र समजला जाणारा हा रंग. आपल्या आवडीनुसार घरातल्या कोणत्याही एका भिंतीला नारंगी रंगाने रंगवू शकतो.
भगवा किंवा केशरी. शारीरिक ऊर्जेने परिपूर्ण असा लाल आणि डोक्याला चालना देणारा पिवळा यांच्या संयोगातून तयार झालेल्या या रंगामध्ये या दोन्ही रंगांचे सर्व चांगले गुणच सामावलेले आहेत. लाल रंगाची आक्रमकता आणि पिवळ्याचा चंचलपणा हे दोष भगवा मागे सोडून येतो. त्यामुळे तो लोकांना जास्त सुसह्य़ वाटतो.
पिवळ्याप्रमाणे हा पण एक उत्साहवर्धक रंग आहे. या रंगामुळे वातावरणात चैतन्य निर्माण होते. खरं तर हा रंग इतका आशावादी आहे की आपल्या रोजच्या जीवनात थोडय़ा प्रमाणात का होईना याचा वापर नक्की करावा. मग भलेही ती एखादी छोटीशी वस्तू का असेना! आपल्या जवळच्या या रंगाच्या अल्पशा अस्तित्वाने देखील मनाला टवटवी येते.
भगवा रंग उत्साहदायी असल्याने आपल्याला दु:खातून बाहेर काढतो. काही कारणाने उदास व निराशेच्या गर्तेत अडकलेल्या माणसांच्या आजूबाजूला हा रंग वापरल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होतो. बरेच वेळेला आपला आजार शारीरिक नसून मानसिक असतो. अशा वेळेस या आजारातून आपण नक्की बरे होऊ अशी उभारी हा रंग देतो!
लाल रंगाचा जो चांगला गुण भगव्यामध्ये उतरला आहे, तो म्हणजे भूक वाढवण्याचा. लाल रंगाचा आक्रमकपणा भगव्या रंगात नसल्याने या रंगाच्या विविध छटा (सौम्यपासून टेराकोटापर्यंत) रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जातात. ज्याचा सकारात्मक परिणाम दिसतो.
पिवळ्या रंगासारखाच आशावादी स्वत:वर विश्वास असलेला व सकारात्मक दृष्टिकोन असलेला भगवा रंग तरुणाईचा आवडता रंग आहे. हा रंग एकमेकांमधील संवाद वाढवतो, चर्चा घडवतो व नवनवीन कल्पनांची जोड देतो. हेच कारण आहे की बहुतेक करून सर्व फास्टफूड सेंटर्समध्ये जिथे तरुण लोकं जास्त येतात, भगव्या व पिवळ्या रंगाची सजावट केली जाते.
हा जसा पराक्रमाचा रंग आहे हा तसाच तो त्यागाचा रंग आहे म्हणून भारतीय राष्ट्र ध्वजात स्थान असलेला हा भगवा!
विवेकानंदाच्या पेहराव्याचा हा रंग!
आपला भारतीय ध्वज फडकावा म्हणून ज्या वीरांगनांनी प्रयत्न केले त्या सगळ्या स्त्री शक्तीचा हा रंग….
राणी लक्ष्मीबाईंपासून ते विजयालक्ष्मी पंडीत, अॅनी बेझंट, अरुणा असफअली, सुचेता कृपलानी, कस्तुरबा गांधी, कमला नेहरू… अशा असंख्य स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचा जसा हा रंग तसाच दुर्दम्य आशावाद, चिकाटी दर्शविणारा हा रंग. अशक्य अशा परिस्थितीतून भरारी घेणाऱ्यांचा हा रंग. अशक्य ते शक्य करण्याची आस बाबाळगणाऱ्यांचा रंग. पराक्रमी शिवबाच्या धाडसी मावळ्यांच्या जरिपटक्याचा हा रंग!
अत्यंत प्रतिकूलतेवर मात करून मानाने उभ्या राहणाऱ्या शूरतेचाही रंग… पाय गमावल्यानंतर ही नृत्य कौशल्य आत्मसात करणाऱ्या सुधा चंद्रन, नसलेल्या पायांनी एव्हरेस्ट सर करणाऱ्या अरुनिमा सिन्हा, पहिली अंध IFS अधिकारी बेनो झेफीन, अॅसिड अॅटॅकने विदीर्ण झालेल तन आणि मन घेऊन एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणारी लक्ष्मी अगरवाल या सगळ्यांचा आहे हा केशरी रंग.
पती कर्नल संतोष महाडिक शहीद झाल्यावर त्यांच स्वप्न जगणाऱ्या आणि माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब हा देशासाठी आहे असं म्हणणाऱ्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा निर्देशक आहे हा भगवा… या भगव्याला त्रिवार मुजरा….
– रश्मी पांढरे ( 9881375076 )