औषधे घेतल्यामुळे काहीवेळा शरीरावर साइड इफेक्ट्स दिसून येतात. हे प्रभाव सौम्य असू शकतात किंवा काही वेळा गंभीरही होऊ शकतात. मात्र, काही गोष्टी लक्षात ठेवल्यास हे साइड इफेक्ट्स कमी करता येऊ शकतात. काही औषधं उपाशीपोटी घेतल्यास अन्ननलिका किंवा पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले नसेल, तर शक्यतो औषध अन्नासोबत घ्यावे. यामुळे पचनसंस्थेवर ताण कमी पडतो आणि औषधाचे दुष्परिणाम टाळता येतात.
औषधांचे Side Effects कमी करण्याचे उपाय. (फोटो सौजन्य - Social Media)
औषधं घेतल्यानंतर शरीरात विषारी घटक (toxins) साचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी रक्तप्रवाह सुधारते आणि किडनीला औषधांचे अवशेष बाहेर टाकण्यास मदत करते.
औषधांसोबत अल्कोहोल घेतल्यास शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. काही औषधं आणि अल्कोहोल एकत्र घेतल्यास लिव्हरवर ताण येतो आणि औषधांचे दुष्परिणाम वाढू शकतात. त्यामुळे औषधे घेत असताना अल्कोहोल टाळणे महत्त्वाचे आहे.
काहीवेळा औषधांमुळे होणारे साइड इफेक्ट्स नियंत्रित करण्यासाठी योगा, ध्यानधारणा, मसाज किंवा अरोमाथेरपी सारख्या पद्धती फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे औषधांच्या दुष्परिणामांमुळे त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन पर्यायी उपचारांचा विचार करावा.
हळद, आले, लिंबू, ग्रीन टी, आवळा यांसारखी सुपरफूड्स शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच, जीवनसत्त्वयुक्त आहार घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि औषधांचे दुष्परिणाम कमी होतात.
औषधांमुळे काही प्रमाणात साइड इफेक्ट्स होऊ शकतात, पण योग्य आहार, हायड्रेशन आणि जीवनशैलीतील काही बदल करून हे दुष्परिणाम नियंत्रित करता येतात. कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.